सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी नाशिकमधील सिन्नरच्या पंचाळे गावामध्ये प्रवचनादरम्यान प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. याप्रकरणी रामगिरी महाराज यांच्यावर आतापर्यंत राज्यातील अनेक जिल्ह्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नाशिकमधील येवल्यात, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापुरात, अहमदनगरमधील तोफखाना, नालासोपारा आणि संगमनेरमध्येही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापाठोपाठ आता बुलढाणा जिल्ह्यात रामगिरी महाराज यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
भारतात प्रवेशासाठी अनेक लोकं सीमेवर
रामगिरी महाराज यांनी नाशिक जिल्ह्यातील मौजे पांचाळे याठिकाणी 16 ऑगस्ट रोजी प्रवचन आयोजित केले होते. यावेळी त्यांनी जनतेला उद्देशून बेछूट आणि बेताल वक्तव्य करीत धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे. ‘177 वर्षांपूर्वी या सप्ताहाला सुरुवात झाली होती. 20 ते 25 लाख लोक येथे येतात. अखंड भजनात तल्लीन होतात. लोकांना भक्ती मार्गाला लावण्याचा प्रयत्न या सप्ताहाच्या माध्यमातून आम्ही करतो. बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत. एक ते दीड कोटी लोक सीमेवर उभे आहेत. भारतामध्ये प्रवेश मागत आहेत. त्यावर प्रतिक्रिया देताना आम्ही सांगितले की, हिंदूंनी मजबूत राहिले पाहिजे. अन्यायाचा प्रतिकार केला पाहिजे,’ असे वक्तव्य महंत रामगिरी महाराज यांनी केले होते. दरम्यान बोलताना त्यांनी मुस्लिम धर्मियांचे धर्मगुरू प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले.
यांनतर राज्यभरात मोठा जमाव रस्त्यावर आला. या जमावाकडून रामगिरी महाराज यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. विशेष म्हणजे रामगिरी महाराज यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्या प्रकरणी वैजापूर आणि येवल्यात गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये रामगिरी महाराजांच्या वक्तव्याच्या विरोधात रोष बघायला मिळतोय.
मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद आणि बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात काल 18 ऑगस्टला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 299 नुसार गुन्हा दाखल केला. गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर बुलढाणा येथील मिलिंद चिंचोळकर नामक इसमाने फेसबुकवर हा व्हिडीओ सार्वत्रिक केला. त्यामुळे शनिवारी, 17 ऑगस्ट रोजी, रात्री बुलढाणा शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
बुलढाणा शहरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान मुस्लिम समाजाचे शेकडो तरुण शहर ठाण्यात धडकले.पोलिसांनी तात्काळ दखल घेत गुन्हा दाखल केला. आरोपी मिलिंद चिंचोळकर याला जुनागांव येथून ताब्यात घेतल्याने तणाव निवळला. जळगाव जामोद पोलीस ठाणे येथेही गुन्हा दाखल करण्यात आला. मौलवी खलील-उर-रहेमान अब्दुल लतीफ यांनी प्रकरणी फिर्याद दिली आहे.
मुख्यमंत्री काय म्हणाले?
एकीकडे या सगळ्या घडामोडी सुरु असताना नाशिकमध्ये एका सप्ताहाच्या कार्यक्रमात महंत रामगिरी महाराज आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकाच व्यासपीठावर होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात मोठं वक्तव्य केलं. या राज्यात संतांच्या केसालाही धक्का लागता कामा नये, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. “या राज्याला मोठी संत परंपरा आहे. संतांच्या आशीर्वादामुळे राज्य कारभार सुरु आहे. म्हणून या महाराष्ट्रात संतांच्या केसाला सुद्धा धक्का लावण्याची हिंमत कुणी करणार नाही”, असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं.
महाराजांना थेट पोलीस प्रोटेक्शन
सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी नाशिक येथील सिन्नरच्या पंचाळे गावामध्ये प्रवचनाच्या दरम्यान मुस्लिम धर्मगुरूंबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्याचे पडसाद राज्यभरात उमटत असून महंत रामगिरी महाराजांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनंतर रामगिरी महाराजांना थेट पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. रामगिरी महाराजांच्या सुरक्षेसाठी बंदूकधारी पोलिसांसह साध्या वेशातील पोलिस तैनात करण्यात आले आहेत.