अधिकाऱ्यावर गैरकारभाराचा ठपका ठेवत त्याच्याविरुद्ध कारवाई व्हावी, यासाठी बुलढाण्यातून अमरावतीला पोहोचून वरिष्ठ कार्यालयासमोर उपोषण करण्याचे नाटक केले. ज्याच्या विरोधात उपोषण सुरू केले त्याच्याकडूनच दोन लाख रुपयांची खंडणी मागितली. याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षांवर अमरावती शहरातील गाडगे नगर पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता. 20) पहाटे खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
यापूर्वी बुलढाण्यातील चिखली शहरात मनसेच्या जिल्हाध्यक्षांसह चार पदाधिकाऱ्यांविरुद्धही खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी व्यापाराला दोन लाख रुपयांची खंडणी मागण्याचा आरोप झालेला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष शिवा पुरंदरे यांनी 19 सप्टेंबरपासून मुख्य वन संरक्षक अमरावती यांच्या कार्यालयसमोर उपोषण सुरू केले होते. त्यांना उपोषणापासून परावृत्त करण्यासाठी वरिष्ठांच्या आदेशाने बुलढाणा वनपरिक्षेत्र अधिकारी अभिजीत ठाकरे व इतर अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत उपोषण मंडपात पोहोचले.
पुरंदरे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु उपोषणकर्त्याने माघार घेतली नाही. म्हणून आरएफओ ठाकरे यांनी शिवा पुरंदरे यांना म्हटले की, आपण बाहेर कुठेतरी बसून शांततेत चर्चा करू आणि मार्ग काढू. त्यावर शिवा पुरंदरे यांनी होकार देत व्हाट्सअप कॉल करण्याचे सांगितले. आरएफओ ठाकरे हे अमरावती येथील रहिवासी आहेत. ते आपल्या घरी परतले आणि शिवा पुरंदरे यांना व्हाट्सअप कॉल केला. तेव्हा पुरंदरे यांनी 2 लाख रुपयांची त्यांना मागणी केली.
वनपरिक्षेत्र अधिकारी अभिजीत ठाकरे यांनी याबाबत पुराव्यांसह अमरावतीच्या गाडगे नगर पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार नोंदवली. त्यामध्ये त्यांनी नमूद केले की, शिवा पुरंदरे यांना मी येण्या जाण्याचा तसेच पेंडॉल साठी 20 हजार रुपये देण्यासाठी तयार झालो होतो. पण पुरंदरे यांनी सहमती दर्शवली नाही. शिवा पुरंदरे यांनी माझी प्रतिमा मलीन करण्याच्या उद्देशाने व मला त्रास देण्याच्या उद्देशाने उपोषणास बसण्याचे नाटक करून माझ्याकडून 2 लाख रुपयांची मागणी केली, अशी तक्रार ठाकरे यांनी दिली. महाराष्ट्र नव नवनिर्माण विद्यार्थी सेना बुलढाणा जिल्हाध्यक्ष शिवा पुरंदरे यंच्या विरुद्ध अमरावती शहरातील गाडगे नगर पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यापूर्वीही खंडणीचा गुन्हा..
जानेवारी 2024 मधे बुलढाणा मनसे जिल्हाध्यक्षासह चार पदाधिकाऱ्यांविरुद्ध खंडणी प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. एका व्यापाऱ्याला मारहाण करून व धमकावून 2 लाखांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले. चिखली येथे ही घटना घडली होती. आरोपींमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे, उप जिल्हाध्यक्ष राजेश परिहार, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष प्रदीप भवर यांसह 10 ते 15 जणांचा समावेश होता. यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत चाललंय तरी काय असा प्रश्न पडला आहे.