महाराष्ट्र

Buldhana News : आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल

MLA Sanjay Gaikwad : स्टंटबाजी भोवली; मुलाच्या वाढदिवसाला तलवारीने ‘केक कटिंग’

बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना स्टंट करणं चांगलच महागात पडलं आहे. वाढदिवसाला तलवारीने केक कापणं आणि तलवारीनेच इतरांना केक भरवणं त्यांच्या अंगाशी आलं आहे. काही दिवसांपूर्वीच वनविभागाने दाखल केलेल्या गुन्ह्यामुळे ते चर्चेत आले होते. आता थेट भाईगिरीसारखा तलवारीने केक कापल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुलढाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये आमदार संजय गायकवाड यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलीस कायदा 135 अन्वये कलम 37 (1) (3) नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचे सुपुत्र मृत्युंजय गायकवाड यांचा दोन दिवसांपूर्वी बुलढाण्यात धुमधडाक्यात वाढदिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात आमदार संजय गायकवाड यांनी भल्या मोठ्या तलवारीने स्टेजवर केक कापला. आणि कापलेला केक तलवारीनेच आपल्या सुविद्य पत्नीला भरविला. या कार्यक्रमाचा व्हिडिओ समाज माध्यमात आता जोरदार व्हायरल होत आहे. सामान्य व्यक्तीने तलवारीने केक कापल्यास त्या व्यक्तीवर आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल होतो. मात्र, आता शिंदेंच्या शिलेदाराने तलवारीने केक कापून त्यास तलवारीने आपल्या सुविद्य पत्नी पूजा गायकवाड व मुलांना केक भरवल्याचा व्हिडिओ समोर आला होता.

याआधीही दाखल झालेत गुन्हे 

शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यासह त्यांचे पुत्र मृत्यूंजय गायकवाड, सोमनाथ चौबे, दिपाली चौबे आणि ज्ञानेश्वर वाघ यांच्यावर आधीही गुन्हा दाखल करण्यात आलाय. शेती बळकावल्याच्या आरोपाखाली दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाने हे आदेश दिले होते. आमदार संजय गायकवाड यांच्यावर नागपूर येथील रीटा उपाध्याय यांनी राजूर येथील दीड एकर शेतजमीन बळकावल्याचा आरोप केला होता. त्यांनतर आपण वाघाची शिकार करून गळ्यात त्याचा दात घातल्याचा दावा आमदारांनी केला होता. तेव्हाही वनविभागाने दाखल केलेल्या गुन्ह्यामुळे ते चर्चेत आले होते.

‘तलवारीनं केक कापणं गुन्हा नाही’ 

या संपूर्ण प्रकरणावर आमदार संजय गायकवाड यांनी भाष्य करत आपल्या कृतीचं स्पष्टीकरण दिलं. “तलवारीनं केक कापणं हा गुन्हा होऊ शकत नाही. तलवारीनं केक कापण्याचा हेतू कोणाचंही नुकसान करण्याचा नाही. यावर गुन्हा दाखल करणं चुकीचं आहे,” असं आमदार संजय गायकवाड यांचं म्हणणं आहे. “नेत्यांना तलवारी देणं हे शौर्याचं प्रतीक मानलं जातं. पोलीस परेडच्या वेळीही पोलीस तलवार दाखवतात, मग ते लोकांना धमकावतात का? मग तर ऑलिम्पिकमधील तलवारबाजीचा खेळही बंद करावा लागेल. आमच्या पूर्वजांपासून आम्ही तलवार चालवतो, म्हणून आम्ही तलवारीचा वापर करू. गैरवापर केला तरच गुन्हा दाखल होऊ शकतो,” असंही ते म्हणाले आहेत.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!