Attack During Election : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणात पोलिसांनी कारवाई केली आहे. नागपूर ग्रामीण पोलिसांनी यासंदर्भात चार अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. देशमुख यांच्यावरील हल्ल्याबाबत अनेक मुद्दे उपस्थित झाले आहे. देशमुखांच्या वाहनावर हल्ला करणारे चार जण होते असं सांगण्यात येत आहे. हल्ला झाला त्यावेळी आणखी एक वाहन देशमुख यांच्यासोबत असल्याचं सांगण्यात येत आहे. अशात कार्यकर्त्यांचा प्रचंड गराडा असताना हल्लेखोर शेतात कसे पळाले असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हल्ला झाला, त्याठिकाणी प्रचंड अंधार होता. त्यामुळं अंधारात शेतातून पळणं अवघड असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. शेतात पळताना हल्लेखोरांच्या हाती रस्ता पाहण्यासाठी टॉर्च होता का, असा प्रश्नही उपस्थित झाला आहे. ऐन निवडणुकीच्या काळात हा हल्ला झाल्यानं तपास यंत्रणांनी हे प्रकरण अत्यंत गंभीरतेने घेतलं आहे. चार अज्ञातांविरोधात आम्ही हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. हल्ल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणीही केली.
सखोल तपास
देशमुख हल्लाप्ररकणात पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आहे. तांत्रिक पुरावेही गोळा केले जात आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असं आवाहन नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी केलं आहे. काटोल या ठिकाणी अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाला. काटोल पोलिसांनी याचा तपास सुरू केला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात सध्या आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यामुळं हल्ल्याचं हे प्रकरण अत्यंत ‘हायप्रोफाइल’ झालं आहे.
बेला फाट्याजवळ पोलिसांनी दगडफेकीच्या घटनास्थळावर तपास केला. देशमुख यांच्या वाहनावर जे दगडं फेकण्यात आलेत, त्याचा तपासही पोलिसांनी केली. अनिल देशमुख सभास्थळावरून निघाले तेव्हापासून बेला फाट्यापर्यंतचे सर्व ‘कॉल डिटेल रेकॉर्ड’ही पोलिस तपासणार आहेत. ज्या ठिकाणी हल्ला झाला, त्या ठिकाणापासून पाच किलोमीटरपर्यंतचे रेकॉर्डही पोलिस तपासत आहेत. हल्लेखोरांचे वर्णन पोलिसांनी घेतले आहे. त्यानुसार शोध मोहिम सुरू करण्यात आली आहे.
पोलिसांनी हल्ल्याची ही घटना अत्यंत गंभीरतेने घेतली आहे. राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता या प्रकरणात कोणतीही ‘रिस्क’ घ्यायची नाही, असं पोलिसांनी ठरविलं आहे. त्यामुळं हल्लेखोरांना शोधून काढण्याचं मोठं आव्हान नागपूर ग्रामीण पोलिसांपुढं निर्माण झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून हल्ल्यासाठी भाजपवर आरोप करण्यात येत आहे. भाजपनं हा हल्ला स्टंटबाजी असल्याचं म्हटलं आहे. अशात पोलिसांपुढं सत्य शोधून काढण्याचं मोठं आव्हान आहे. हल्ल्याची घटना मतदानाच्या काही तास अगोदरच झाली आहे. त्यामुळं नागपूर ग्रामीण पोलिस किती तासात याचा छडा लावतात, याकडंही सर्वांचं लक्ष आहे.