मध्य नागपूर मतदारसंघात बुधवारी रात्री निवडणूक आयोगाच्या वाहनांची तोडफोड करणे काॅंग्रेसचे उमेदवार बंटी शेळके यांना चांगलेच महागात पडले आहे. पोलिसांनी शेळकेंसह २० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दंगल, सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला, सरकारी कामात अडथळा, तोडफोड, धमकावणे यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला असून, काही आरोपींना अटकदेखील करण्यात आली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.
२० नोव्हेंबर रोजी मतदान झाल्यानंतर अतिरिक्त ईव्हीएम नेणारे वाहन किल्ला परिसरातील बुथबाहेर निघाले. त्यावेळी अचानक काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी ती गाडी थांबवली. त्यांनी शिवीगाळ करत त्यावर हल्ला केला व तोडफोड केली. त्याचवेळी (एमएच १९, बीयू ६०२७) ही गाडीदेखील निघाली. त्यात बसलेल्या कर्मचाऱ्यावरदेखील हल्ला करण्यात आला. तरुणांनी दगड व लोखंडी रॉड्सनी कारची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. तातडीने पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले व कर्मचाऱ्यांना सुरक्षित जागेवर नेले.
तोडफोड करण्यात आलेली गाडी कोतवाली पोलिस ठाण्यात नेण्यात आली, तर ईव्हीएमला दुसऱ्या वाहनातून रवाना करण्यात आले. ही बातमी पसरताच भाजपा व काँग्रेस कार्यकर्ते जमा झाले आणि त्यानंतर रात्री तुफान राडा झाला. ईव्हीएमसोबत कुठलाही गैरप्रकार झाला नसतानादेखील काॅंग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्याबाबत झोन अधिकारी हुमैद नाजीर खान यांच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
खान यांना नियमानुसार राखीव ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅट मशीन देण्यात आले होते. त्यांच्या वाहनात ते ठेवण्यात आले होते. संध्याकाळी सात वाजता मतदानाच्या अहवाल फॉर्मची झेरॉक्स प्रत घेण्यासाठी ते बुथवरून वाहनातून निघाले. कल्याणेश्वर मंदिर ते झेंडा चौकादरम्यान झेरॉक्स सेंटर पाहून खान थांबले. तेथे हा प्रकार घडला. खान यांनी शेळके यांना नेमके तथ्यदेखील सांगितले. मात्र, काॅंग्रेस कार्यकर्त्यांनी हल्ला केला.
हायकमांडने घेतली दखल!
बंटी शेळके यांनी मध्य नागपुरात माहोल तयार केला होता. प्रियंका गांधी स्वतः त्याच्या साक्षीदार ठरल्या. संघाचे मुख्यालय असलेल्या महालात काँग्रेसला मिळणारे समर्थन बघून त्या भारावल्या होत्या. पण आयोगाच्या गाडीवर दगडफेक करून काँग्रेस कार्यकर्त्यांनी पायावर कुऱ्हाड मारून घेतली, असे बोलले जात आहे. विशेष म्हणजे हायकमांडने या घटनेची दखल घेतली आहे. त्यामुळे बंटी शेळके यांचा विजय झाला नाही तर त्यांना कारवाईला देखील सामोरे जावे लागू शकते.