Triangular Fight : अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील निवडणूक यंदा चुरशीची होणार आहे. एकमेकांना कोंडीत पकडण्यासाठी भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि प्रहारने रणनीती तयार केली आहे. सोमवारनंतर (4 नोव्हेंबर) अकोल्यात मोठ्या प्रमाणावर राजकीय फटाके फुटणार आहेत. अकोल्यात भाजपकडून विजय अग्रवाल हे उमेदवार आहे. काँग्रेसनं साजिद खाान पठाण यांना उमदेवारी दिली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहर प्रमुख राजेश मिश्रा हे देखील रिंगणात आहे.
या तीनही उमेदवारांनी एकमेकांना कोंडीत पकडण्यासाठी रणनीती तयार केली आहे. मात्र त्यांना प्रतीक्षा आहे ती, अर्ज मागे घेण्याची मुदत संपण्याची. एकदा अर्ज मागे घेण्याची मुदत संपली की, कोणाशी कसे निपटायचे याची तयारी तीनही उमेदवारांनी करून ठेवली आहे. भाजपचे काही पदाधिकारी आणि शिवसेनेकडून विजय अग्रवाल यांच्या विरोधात प्रचार सुरू आहे. विजय अग्रवाल यांनी महापालिकेच्या सभागृहाला टिपू सुलतान नाव कसे दिले याचा ठराव भाजप आणि शिवसेना ठाकरे गटाकडून व्हायरल करण्यात आला होता.
‘वेट अॅन्ड वॉच’
सध्या भाजपकडून ‘वेट अॅन्ड वॉच’ करण्यात येत आहे. राजेश मिश्रा आणि साजिद खान पठाण यांचे महापालिकेतील कागदं शोधण्यात आलं आहेत. सोमवारनंतर साजिद आणि राजेश यांच्या प्रत्येक आरोपाला प्रत्युत्तर देण्यासाठीची तयार करण्यात येत आहे. अशीच तयारी साजिद खान यांच्याकडून करण्यात येत आहे. आपल्यासोबत भाजपचे कोण कोण आहेत, याचा पलटवार ते करण्याची शक्यता आहे. राजेश मिश्रा हे देखील सध्या पुरावे जमा करीत आहेत. त्यातून ते भाजप साजिद खान यांना असे सहकार्य करते, हे जनतेला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे.
तीनही प्रमुख उमेदवारांकडून यंदाच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे सोमवारनंतर अकोल्यात राजकीय दिवाळी सुरू होईल यात शंकाच नाही. प्रचाराच्या धावपळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा अकोल्यात होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अकोल्यात सभा घेतली होती. मात्र मोदी-शाह यांच्याऐवजी अकोल्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा व्हावी, अशी अनेकांची इच्छा आहे. योगी आदित्यनाथ यांनी प्रखर हिंदुत्वावर भाष्य करावं, असं सांगण्यात येत आहे.
राहुल, उद्धव यांचा दौरा
काँग्रेसकडून राहुल गांधी यांची सभा अकोल्यात व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहे. शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांना अकोल्यातील जनतेला संबोधित करावं अशी अपेक्षा शिवसैनिकांची आहे. परंतु अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आणि शिवसेना एकमेकांच्या विरोधात लढत आहे. त्यामुळे अकोला शहरात उद्धव ठाकरे यांची सभा होणार का? याबद्दल साशंकता आहे. अशात आमदार नितीन देशमुख यांच्या प्रचाराच्या निमित्तानं ठाकरे अकोल्यात येऊ शकतात, असं सांगण्यात येत आहे. मात्र अद्यापही राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्या सभांबाबत अनिश्चितता आहे. या तीनही नेत्यांच्या सभा अकोल्यात झाल्यास विधानसभा निवडणुकीत अटीतटीची ठरणार आहे.