विधानसभा निवडणुकीची तयारी करणाऱ्या इच्छुकांची धाकधुक वाढलेली आहे. कारण आघाडी आणि युतीमध्ये फक्त बैठकाच सुरू आहे. कुणीही यादी जाहीर केलेली नाही. अशात आपलं नाव अजून जाहीर झालेलं नसल्याने उमेदवारांचं टेंशन वाढलं आहे. अशात जिल्ह्यामध्ये राजकीय सन्नाटा अनुभवायला मिळत आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. 20 नोव्हेंबरला राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक पार पडणार आहे. त्यापूर्वी नामांकन अर्ज दाखल करण्याची तारीख तोंडावर येऊन ठेपली आहे. 22 ऑक्टोबर पासून उमेदवारी अर्ज भरण्याच्या तारखेला सुरुवात होणार असून 29 ऑक्टोबर पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. मात्र अद्यापही जिल्ह्यातील एकाही मतदारसंघात एकाही पक्षाचा उमेदवार जाहीर झाला नाही. त्यामुळे इच्छुकांची उत्कंठा शिगेला तर पोहचलीच आहे. मात्र मोठी धाकधूकही वाढली आहे.
इच्छुकांच्या संख्येत वाढ
गेल्या काही दिवसांपासून निवडणुकीची तयारी करीत असलेले इच्छुक आता मात्र शांत आहेत. जिल्ह्यात एकूण पाच मतदारसंघ आहेत. पाचही मतदारसंघात सर्वच पक्षातील इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे इच्छुकांकडून दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत. या निवडणुकीत पक्षांची संख्या वाढली आणि इच्छुकही वाढले. त्यामुळे पक्ष नेतृत्वाकडून उमेदवार जाहीर करताना डोकेदुखी मात्र वाढणार आहे.
जिल्ह्यातील अकोला पूर्व मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार रणधीर सावरकर यांची उमेदवारी पक्की मानली जात आहे. याशिवाय महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेनेने या मतदारसंघावर दावा केला आहे. काँग्रेसकडून पूजा काळे, राजेश मते, हेमंत देशमुख आदी इच्छुक आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाकडून गोपाल दातकर, माजी आमदार हरिदास भदे हे इच्छुक आहेत. तर वंचितकडून सुशांत बोर्डे, ज्ञानेश्वर सुलताने, संतोष हुसे, धैर्यवर्धन फुंडकर यांची नावे चर्चेत आहे.
अकोला पश्चिम हा गेल्या तीस वर्षांपासून भाजपचा गड राहिला आहे. आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनानंतर भाजपचा वारसदार कोण असा प्रश्न आहे. दरम्यान या मतदारसंघासाठी भाजपकडून उमेदवारी मागणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. तर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे मतदान वाढल्याने काँग्रेसमधील इच्छुकांची संख्याही वाढली आहे.
भाजपकडून कृष्णा शर्मा, हरीश अलीमचंदानी, डॉ. अशोक ओळंबे, गिरीश जोशी, अश्विनी हातवळणे, अॅड. मोतिसिंह मोहता अशी मोठी यादी आहे. तर काँग्रेस मधूनही अनेक इच्छुक आहेत. त्यामध्ये साजिद खान, डॉ झिशान हुसेन, बबनराव चौधरी यासह अनेक जण इच्छुक आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाकडूनही राजेश मिश्रा यांच्या नावाची चर्चा आहे. तर वंचितकडूनही अनेक इच्छुकांच्या नावाची चर्चा आहे.
अकोट
अकोट मतदारसंघात सध्या भाजपचे विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे हे इच्छुक आहेत. याशिवाय डॉ रणजित पाटील, विशाल गणगणे हे इच्छुक आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाकडूनही या मतदारसंघावर दावा केला जात आहे. यामध्ये माजी आमदार संजय गावंडे, दिलीप बोचे, डॉ. मनीषा मते (मा. नगराध्यक्ष), शिवा मोहोड हे इच्छुक आहेत. तर काँग्रेस कडून प्रशांत पाचडे, ऍड. महेश गणगणे, संजय बोडखे आदी इच्छुक आहेत. प्रहार जनशक्ती पक्ष कडून अनिल गावंडे यांचे नाव चर्चेत आहे. यांशिवाय वंचित आणि मनसे इच्छुकांचाही संख्या मोठी आहे.
बाळापूर
बाळापूर मतदारसंघात सध्या महायुतीत मोठी रस्सीखेच आहे. यामध्ये महायुतीत मोठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे. तीनही पक्षाकडून दावा केला जात आहे. शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान आमदार नितीन देशमुख यांची उमेदवारी पक्की मानली जात आहे. तर वंचित कडून नतिकोद्दीन खतीब यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून संदीप पाटील, कृष्णा अंधारे यांच्या नावाची चर्चा आहे. शिवसेना शिंदे गटाकडून रामेश्वर पवळ, विठ्ठठल पाटील सरप हे इच्छुक आहेत. तर काँग्रेसकडून प्रकाश तायडे इच्छुक आहेत. तर भाजपकडून बळीराम सिरस्कार, नारायणराव गव्हाणकर आदी इच्छुक आहेत.
मूर्तीजापूर
मूर्तिजापूर मतदारसंघातही इच्छुकांची भाऊ गर्दी आहे. या मतदारसंघात विद्यमान आमदार हरीश पिंपळे, श्रावण इंगळे, सागर सावळे हे भाजपकडून इच्छुक आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात तर इच्छुकांची रीघ लागली आहे. सम्राट डोंगरदिवे, रवी राठी, आनंद पिंटू वानखडे, शामराव वाहुरवाघ आदी इच्छुक आहेत. तर वंचित बहुजन आघाडी कडून डॉ. सुगत वाघमारे, प्रतिभा अवचार, पुष्पा इंगळे (माजी. जि.प. अध्यक्ष) हे इच्छुक आहेत.