Assembly Election : भारतीय जनता पार्टीचे राज्य कार्यकारिणी सदस्य कृष्णा गोवर्धन शर्मा यांनी अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची तक्रार केली आहे. प्रचारादरम्यान गैरप्रचाराची ही तक्रार आहे. शर्मा यांनी प्रहार जनशक्ती पार्टीचे उमेदवार डॉ. अशोक ओळंबे, अपक्ष उमेदवार हरीश आलिमचंदानी व अपक्ष उमेदवार राजेश मिश्रा यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. तक्राराची प्रत जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देण्यात आहे. याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
अकोला पश्चिम मधील उमेदवार भाजपचे दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांच्या फोटोचा वापर करीत आहेत. गोवर्धत शर्मा हे कृष्णा शर्मा यांचे वडील होते. माजी राज्यमंत्री गोवर्धन शर्मा यांचा फोटो निवडणूक प्रचार फलकांवर लावला जात आहे. कृष्णा शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या वडिलांचे छायाचित्र वापरून मतदारांची दिशाभूल करण्यात येत आहे. प्रचाराद्वारे काही उमेदवारांनी असा संदेश दिला आहे की, त्यांना भाजपचा पाठिंबा आहे. यामुळं भाजप समर्थकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.
कृष्णा शर्मा यांनी निवडणूक आयोगाला विनंती केली आहे की, हे फलक तत्काळ काढले जावे. संबंधित उमेदवारांवर लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 अंतर्गत कारवाई करण्यात यावी. त्यांच्या म्हणण्यानुसार, हा आदर्श आचारसंहितेचा भंग आहे. कायद्याने दंडनीय अपराध आहे. आपल्या वडीलांनी आपल्या पूर्ण जिवनात भारतीय जनता पार्टीच्या ध्येयधोरणांचा पुरस्कार केला. कधीही स्वहिताकरीता पक्षाविरूध्द कोणतेही कार्य केले नाही. तसे करणाऱ्याला पाठिंबा दिला नाही. परंतु आपल्या वडीलांच्या नावाचा व कार्याचा गैरवापर होत आहे.
या उमेदवारांची नावे
आपल्या वडिलांच्या नावाचा, फोटोचा वापर करीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजय अग्रवाल यांच्याविरुद्ध निवडणुकीत अपप्रचार केला जात आहे. मतदारांची दिशाभुल करीत आहेत. यापैकी डॉ. अशोक ओळंबे यांनी अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी केली होती. हरीश आलिमचंदानी यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. अनेकांनी आपले वडिल शर्मा यांच्या विरोधात प्रचार केला होता. आता आपल्या राजकीय स्वार्थासाठी आपल्या वडिलांच्या नावाचा वापर करण्यात येत असल्याचं कृष्णा म्हणाले. निवडणूक प्रचारार्थ लावण्यात आलेल्या जाहिरात फलकांवर वडीलांचा फोटो लावण्याबाबत आपली कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही, असंही कृष्णा शर्मा म्हणाले. त्यामुळं असा प्रचार करणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी देखील कृष्णा शर्मा यांनी केली आहे.