Feilding For MLA : विधानसभा निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी आमदार होण्याची स्वप्न पाहणाऱ्या इच्छुकांकडून मतदारांना आकर्षित करण्याचा जोरदार प्रयत्न सुरू आहे. सोमवारी (ता. 3) अकोल्यात श्री राजराजेश्वर महाराजांचा सर्वांत मोठा कावड महोत्सव संपन्न झाला. अखेरचा श्रावण सोमवार असल्याने या सोहळ्यात सर्वच पक्षाच्या इच्छुकांनी वेगवेगळ्या प्रकारे मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न केले.
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. त्यापूर्वी राजकीय पक्ष, संघटना तयारीला लागले आहेत. नेत्यांकडून मोर्चेबांधणीला वेग आला आहे. जागा वाटपावर चर्चाही केली जात आहे. अशातच इच्छुक कसे मागे राहितील. महत्वाच्या पक्षातील इच्छुक भावी आमदारही जोमाने कामाला लागले आहेत. सध्या उत्सवांचे दिवस आहेत. येणाऱ्या चार महिन्यांत अनेक सण, उत्सव साजरे होणार आहेत. याच उत्सवात सध्या नेते खासकरून निवडणुकीसाठी इच्छुक मतपेरणी करीत आहेत.
भोलेचे भक्त पावणार?
श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी अकोला शहरात मोठ्या पालखी सोहळा साजरा होतो. गेल्या 80 वर्षांची मोठी परंपरा अकोल्यात आहे. अकोला शहराचे आराध्य दैवत असलेल्या श्री राजराजेश्वराला गांधीग्राम येथुन पूर्णा नदीच्या पाण्याने अभिषेक केला जातो. यासाठी कावडधारी पायी पूर्णा नदीचे पाणी आणतात. कोविड महासाथीचा काळ वगळता ही परंपरा निरंतर सुरू आहे. सोमवार, 2 सप्टेंबर रोजी शेवटचा सोमवार होता. त्यामुळे कावड महोत्सव उत्साहात पार पडला
Officer Transfer : साहेबांनी गर्भपात झाल्यानंतरही नाकारली होती रजा
कावड सोहळ्यात हजारो भाविक सहभागी झाले होते. पालख्या, कावड आणि शिवभक्तांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. स्वागत करणाऱ्यांमध्ये विधानसभा इच्छुकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. इच्छुकांकडून स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. राजकीय नेत्यांमध्ये खासकरून भावी आमदारकीचे स्वप्न पाहणारे चांगलेच ‘अॅक्टिव्ह’ होते. श्री राजराजेश्वर शिवलिंग मंदिर अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात येते.
संपूर्ण कावड यात्रा ही याच मतदारसंघात निघते. त्यामुळे अकोला पश्चिम मतदारसंघातील आमदारकीसाठी इच्छुक नेत्यांनी शिवभक्तांच्या स्वागताची व्यवस्था केली. वेगवेगळ्या प्रकारे इच्छुकांनी शक्ती प्रदर्शन केले. पाणी, चहा, नाश्ता, फराळ आणि फळांचे वाटप करण्यात आले. शिवभक्त असलेल्या मतदारांना आकर्षित करण्याचा मोठा प्रयत्न करण्यात आला. विधानसभे नंतर अकोला महापालिकेची निवडणूकही होणार आहे. त्यामुळे संभाव्य भावी नगरसेवकही कावड यात्रेत शिवभक्तांची सेवा करताना दिसले. यात भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असे सगळेच आघाडीवर होते.