महाराष्ट्र

Assembly Election : अकोला पूर्वमध्ये ठाकरेंचा उमेदवार ठरला !

Shiv Sena : जिल्हाप्रमुख गोपाल दातकार यांना उमेदवारी जाहीर

Akola East : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. दरम्यान अकोला पूर्व मतदार संघात अखेर शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार ठरला आहे. शिवसेनेचा बूथ प्रमूख आणि शाखाप्रमुख यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात खासदार अरविंद सावंत यांनी अकोला पूर्व मधून गोपाल दातकर यांना निवडून आणण्याचे आवाहन केले. त्यानंतर काहीच वेळात शिवसेनेची यादी जाहीर झाली. त्यात गोपाल दातकरांचा समावेश आहे. 

महायुती विरुद्ध महाविकास आघाडी

आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. या निवडणुकीसाठी दोन्ही आघाड्यांकडून जागावाटपावर चर्चा सुरू आहेत. भाजपकडून 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये अकोला पूर्वमधून आमदार रणधीर सावरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघात तिहेरी लढतीचा सामना बघायला मिळणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीतही तिहेरी लढत होण्याची शक्यता आहे.

दरम्यान या मतदारसंघावर महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने दावा केला होता. काँग्रेसमधून अनेक इच्छुक या मतदारसंघासाठी इच्छुक होते. तर शिवसेनेकडूनही जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, माजी आमदार हरिदास भदे, माजी आमदार गजानन दाळु गुरुजी आदींच्या नावाची चर्चा होती. अखेर शिवसेना ठाकरे गटाकडून या मतदारसंघासाठी उमेदवार ठरला. गोपाल दातकर यांच्यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून बूथ प्रमुख मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. येथूनच त्यांच्या प्रचाराचा नारळ फुटल्याचे सांगितले जात आहे.

अखेर उमेदवार ठरला !

अकोला पूर्व मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल याबाबत चर्चा सुरू असतानाच शिवसेना ठाकरे गटांकडून गोपाल दातकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कालच्या मेळाव्यात दातकरांना निवडून आणण्याचे आवाहनही कार्यकर्त्याना करण्यात आले. तर 29 ऑक्टोबर रोजी गोपाल दातकर उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Assembly Elections : पक्षाला युवा उमेदवार चालेना?

तिरंगी लढत होणाऱ्या अकोला पूर्व विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात 2014 च्या निवडणुकीत आमदार रणधीर सावरकर आणि वंचित बहुजन आघाडीचे हरिदास भदे यांच्यामध्ये चुरशीची लढत झाली होती. रणधीर सावरकर यांना 53,678 एवढी मतं मिळाली वंचित बहुजन आघाडीचे हरिदास पंढरी भदे यांना 51,238 एवढी मतं मिळाली 2,440 एवढ्या मताने आमदार रणधीर सावरकर यांनी हरिदास भदे यांचा पराभव केला. तर 2019 मध्ये आमदार सावरकर यांना 1,00,475 तर हरिदास भदे यांना 75,752 एवढी मतं मिळाली 24,723 एवढ्या मतांनी हरिदास भदे यांचा पराभव झाला होता.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!