महाराष्ट्र

Ravikant Tupkar : सगळं करा पण सेटिंग करू नका!

Maharashtra Assembly Election : राज्यभरात उमेदवारांमुळे बदलणार समीकरण

Political Battel : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha) शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना अपयश आले. परंतु अपयश आल्यानंतर प्रचंड चर्चेत राहणारे उमेदवार म्हणून ते पुढे आले आहेत. तब्बल अडीच लाखावर मतदान रविकांत तुपकर यांनी बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून (Buldhana Constituency) घेतले आहे. त्यामुळे तुपकर आता चांगलेच दखलपात्र झाले आहेत. प्रस्थापित पक्षांच्या उमेदवारांना तुपकर यांनी चांगलीच टक्कर दिली आहे. त्यामुळे या शेतकरी नेत्यासोबत जनाधार आहे, असेच म्हणता येणार आहे. आता तुपकर यांनी महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात तुपकर अपक्ष उमेदवार रिंगणात उतरविणार आहेत. राज्यातील उर्वरित मतदारसंघांबाबत त्यांचे अन्य नेत्यांशी बोलणे सुरू आहे. तुपकर यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा केली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट (NCP Sharad Pawar) आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट (Shiv Sena Uddhav Thackeray) हे दोन पर्याय समोर असल्याचे त्यांच्या सहकाऱ्यांनी तुपकर यांना सांगितले. सर्वसमावेश विचार केल्यानंतर तुपकर यांनी सध्या ‘एकला चला रे’ची भूमिका घेतली आहे.

तिसरी आघाडी शक्य

राज्यात सध्या तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरू आहे. संभाजी राजे छत्रपती हे नवा राजकीय पक्ष स्थापन करीत आहेत. प्रहार जनशक्ती पार्टीचे नेते आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) हे संभाजी राजे यांच्यासोबत एकत्र येण्याची शक्यता आहे. या तिसऱ्या आघाडीत रविकांत तुपकर सहभागी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. असे झाल्यास महाराष्ट्राच्या राजकारणात ही तिसरी आघाडी समीकरण बदलणारी ठरेल. मात्र या सर्वांत तुपकर यांनी सर्व काही करावं सेटिंग मात्र करू नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

रविकांत तुपकर आजही स्वाभिमानी शेतकरी संघटनामध्ये (Swabhimani Shetkari Sanghatana) आहेत. बुलढाण्यातील बैठकीनंतर त्यांनी आपण राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु शेट्टी यांचे सतत तळ्यातमळ्यात सुरू असते. कधी ते भाजपसोबत असतात. कधी काँग्रेससोबत जातात. कधी राष्ट्रवादी काँग्रेससोबत बसतात. ही बाब शेतकरी चळवळीतील अनेकांना खटकत आहे. तुपकर हे त्या खटणाऱ्यांपैकीच एक आहेत. त्यामुळे तुपकर यांनी शेट्टी यांचा कित्ता गिरवू नये, अशी अपेक्षा आहे.

शेतकऱ्यांना वाली राहावा

रविकांत तुपकर यांची जडणघडण बुलढाण्यात असताना अगदी जवळून पाहण्याचा योग आला. बुलढाण्यातील एका छोट्याशा खेड्यातून आलेला हा तरूण आज मोठा शेतकरी नेता झाला आहे. तुपकर यांच्या कारकीर्दीवर आजपर्यंत कोणताही डाग नाही. ही त्यांची जमेची बाजू आहे. सुरुवातीपासून हा भूमिपूत्र बळीराजासाठी आक्रमक असल्याचे बघायला मिळाले. ‘रविकांत तुपकर हे मीडियाने मोठे केलेले प्रॉडक्ट असे सगळेच म्हणतात.’ पण हे म्हणत असताना तुपकर यांनी शेतकऱ्यांसाठी गाळलेला घाम आणि रक्ताचे केलेले पाणी कोणालाही दिसत नाही. शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून तुपकरांनी अनेक उपोषणं केली. त्याचा अगदी त्यांच्या शरीरावरही परिणाम झाला. प्रसंगी अंगावर रॉकेलही घेतलं. हे अनेकांना कदाचित दिसले नसावे.

तुपकर यांच्या अनेक आंदोलनांमुळे शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळाला आहे. परंतु प्रत्यक्ष सत्तेत गेल्याशिवाय शेतकऱ्यांची दयनीय अवस्था बदलता येत नाही, ते फार आधीच लक्षात आल्यानेच तुपकर यांनी लोकसभा निवडणूक लढविलेली दिसते. त्यात त्यांना अपयश आले. पण अपयश ही यशाची पहिली पायरी असते, असे मानत त्यांनी आता विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. पण हे सारं करीत असताना त्यांना सत्ता मिळविण्यासाठी नको ती तडजोड करू नका, असा सल्ला आवर्जून द्यावासा वाटतो. राज्यात अनेक पक्ष असे आहेत ज्यांचे राजकारण जातीआधारित आहेत. काही पक्ष असे आहेत, जे सत्तेसाठी कोणतीही तडजोड करतात. या साऱ्यांच्या गर्दीत तुपकर यांना योग्य पर्याय निवडावा लागणार आहे.

एक चूक अन्..

सत्ता हाती असल्याशिवाय शेतकऱ्यांचे भले होणार नाही, हे जरी खरे असले तरी तुपकर यांना युती, आघाडी करताना सदासर्वकाळ शेतकऱ्यांचे हितच डोळ्यापुढे ठेवावे लागणार आहे. भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारताचे अर्थकारण कृषीवरच अवलंबून आहे. हे वाक्य अगदी बालवाडीपासून आपण वाचत आलो आहे, ऐकत आलो आहे. पण तरीही शेतकऱ्यांच्या अंगावर आजही मळके, फाटके धोतरच आहे. सरकारजवळ शहरांमध्ये एसी घरांसाठी वीज आहे. पण शेतकऱ्यांना सलग बारा तास कृषिपम्पासाठी पुरवायला वीज नाही. खरा शेतकरी आजही कर्जाच्या चक्रव्यूहात अडकलेला आहे. पण जे ‘पार्टटाइम’ धनदांडगे शेतकरी आहेत, ते योजनांचा लाभ घेत आहेत.

खऱ्या शेतकऱ्याला बियाण्यांसाठी, कर्जासाठी पिकविम्यासाठी आजही डोळ्यात आसवे आणावी लागतात. हे सगळे विदारक वास्तव तुपकर यांना कोणताही निर्णय घेताना डोळ्यापुढे ठेवावेच लागणार आहे. अनेक वर्षांपूर्वीची एक घटना आजही मनात ताजी आहे. बुलढाण्यात एका शेतकऱ्याने स्वत:चे चरण रचले. त्यानंतर स्वत: आगीत उडी मारून जीव दिला होता. त्यावेळचे तरुण रविकांत तुपकर या घटनेच्या निमित्ताने पुन्हा डोळ्यापुढे आलेत. तुपकर त्यावेळी अगदीच तरूण होते. पण त्यांच्या डोळ्यातून त्याघटनेनंतर घळघळणारे पाणी त्यांना शेतकऱ्यांबद्दल मनापासून किती तळमळ आहे, हे बरेच काही सांगून गेले. त्यामुळे त्यांना मनापासून एकच सांगावेसे वाटते, रविभाऊ सगळं काही करा, पण शेतकऱ्यांच्या नावाखाली सेटिंग होऊ देऊ नका!

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!