Govardhan Sharma : अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाची निवडणूक आजपर्यंत गोवर्धन शर्मा उर्फ लालाजी यांच्याशिवाय कधी झालीच नाही. लालाजी यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झालं. त्यामुळे भाजपला या मतदारसंघात नव्या उमेदवाराचा शोध घ्यावा लागला. प्रचंड रस्सीखेच झाल्यानंतर अखेर भाजपने माजी महापौर विजय अग्रवाल यांना उमेदवारी दिली आहे. मात्र विजय अग्रवाल यांच्या विरोधात निवडणूक लढणाऱ्या सगळ्यांनीच लालाजींच्या पुण्याईचा आधार घेण्यास सुरुवात केली आहे.
विजय अग्रवाल हे भाजपचे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक बॅनरवर आमदार गोवर्धन शर्मा उर्फ लालाजी यांचा फोटो असणे स्वाभाविक आहे. परंतु महाविकास आघाडीमध्ये असलेल्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार राजेश मिश्रा यांनीही लालाजींच्या फोटो आणि नावाचा वापर सुरू केला आहे. माजी नगराध्यक्ष हरीश अलीमचंदानी हे भाजपमध्ये होते. उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. अलीमचंदनी यांचे लालाजी यांच्याशी व्यक्तिगत संबंधही होते.
मनापासून मान
हरीश अलीमचंदानी यांच्याकडे लालाजी नंतरचे ‘परफेक्ट’ उमेदवार म्हणून पाहिले जात होते. त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी, त्यांच्याकडूनही आमदार गोवर्धन शर्मा उर्फ लालाजी यांच्या नाव व फोटोचा वापर होत आहे. अलीमचंदानी हे मनापासून लालाजी यांच्या फोटोचा वापर करीत असल्याचे सांगण्यात येत आहे. लालाजी हे स्वतः व्यापारी होते. सिंधी समाजाने नेहमीच त्यांना साथ दिली. अशात अलीमचंदानी यांच्याकडून लालाजी यांच्या नाव व फोटोचा होत असलेला वापर अकोल्यातील अनेकांना भावत आहे.
भाजपमधून बंडखोरी करीत प्रहार जनशक्ती पार्टीत गेलेले डॉ. अशोक ओळंबे यांनी देखील आमदार गोवर्धन शर्मा उर्फ लालाजी यांच्या नाव व फोटोचा वापर केला. ओळंबे हे भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी होते. दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांच्यासोबत त्यांनी काम केले आहे. अकोल्यात भाजपचे बिजारोपण झाले आणि भाजपचा वटवृक्ष झाला तो काही नेत्यांमुळे. या नेत्यांमध्ये दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा उर्फ लालाजी यांच्या नावाचाही समावेश आहे.
लालाजी आता हयात नसले तरी अकोल्यातील लोकांच्या हृदयात मात्र ते आहे. निवडणूक आली म्हटल्यावर स्वाभाविकच नागरिकांना आमदार गोवर्धन शर्मा या नावाची आठवण होते. आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनानंतरची ही पहिली विधानसभा निवडणूक आहे. ही निवडणूक लालाजी यांच्याशिवाय होणार आहे, यावर आजही अनेकांचा विश्वास बसत नाही. त्यामुळेच काही जण मनापासून तर काहीजण राजकीय फायद्यासाठी लालाजी यांच्या नावाचा वापर करीत आहेत.