महाराष्ट्र

Shiv Sena : शिंदे गटाला घ्यावा लागतोय बुरख्याचा सहारा

Assembly Election : मतदार संघात केले वाटप

 New Funda For Vote : लोकसभा निवडणुकीत अल्पसंख्याक समुदायाने महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला. महायुतीच्या नेत्यांनी अनेकदा ही बाब बोलून देखील दाखवली होती. विधानसभा निवडणुकीतही याचा फटका बसू नये, म्हणून महायुतीच्या नेत्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यातच आता मुंबईतील भायखळा विधानसभा मतदारसंघात शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांनी मुस्लिमबहुल भायखळा परिसरात बुरखा वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमामुळे आता राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे.

खेचण्याचा प्रयत्न

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच पक्ष दलित आणि मुस्लिम व्होटबँक आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न करत आहेत. याचा सर्वांत मोठा फटका भाजप आणि शिवसेनेला स्पष्टपणे बसला आहे. त्यातच आता शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांनी आपला भायखळ्याचा गड राखण्यासाठी पुन्हा एकदा मुस्लिम समुदायाला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

सर्वांचे वेधले लक्ष

आमदार जाधव यांनी शिवसेनेच्या बॅनरखाली मुस्लिम महिलांना बुरखा वाटपाचा कार्यक्रम घेतला. या बॅनरने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. पहिल्यांदाच भायखळा विधानसभा मतदारसंघामध्ये मुस्लिम महिलांना बुरखा वाटण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यामुळे या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात मुस्लिम महिलांनी हजेरी लावावी, अशा आशयाचे बॅनरवर पाहायला मिळाले. कट्टर हिंदुत्ववादी, अशी ओळख असलेल्या शिवसेनेकडून विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अशा प्रकारचे कार्यक्रम केले जात असल्याची टीका विरोधकांनी आता केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि त्यांचे कार्यकर्ते मुलींना शाळेत बुरखा घालण्यापासून रोखत आहेत. मात्र येथे बुरखा दान केला जात आहे. हा ढोंगीपणा आहे, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. बुरखा वाटपाच्या कार्यक्रमानंतर आमदार जाधव विरोधकांच्या निशाण्यावर आल्या आहेत.

Nana Patole : तरविंदरसिंह मारवाच्या मुसक्या आवळा

झाला होता पराभव 

लोकसभेला भायखळ्यातच महायुतीला मोठा फटका बसला होता. गेल्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांनी शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांचा 52 हजार मतांनी पराभव केला. या निवडणुकीत यामिनी जाधव ज्या भायखळा विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात, त्याच मतदार संघातून अरविंद सावंत यांना सर्वाधिक मतं मिळाली होती. ठाकरे गटाचे आमदार असलेल्या वरळी आणि शिवडीपेक्षाही अधिक मतं अरविंद सावंत यांना भायखळा मतदारसंघात मिळाली. भायखळा विधानसभा मतदार संघात यामिनी जाधव यांना 40 हजार 817 मतं मिळाली. अरविंद सावंत यांना दुप्पट म्हणजे तब्बल 86 हजार 883 मतं मिळाली. यामिनी जाधव यांच्यापेक्षा सावंत यांना या एकट्या मतदार संघात 46 हजार 66 मतांची आघाडी मिळाली होती.

error: Content is protected !!