Suspension : नरेंद्र जिचकार, राजेंद्र मुळक, याज्ञवल्क्य जिचकार यांच्यानंतर आता बंटी शेळके यांच्यावरही निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यांना पक्षातर्फे कारणेदाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. परंतु, एकामागोमाग नेत्यांचे निलंबन होत गेले, तर नागपूर जिल्ह्यात काँग्रेस उरणारच नाही. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नागपूर जिल्ह्यातून काँग्रेसला हद्दपार करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप आता काँग्रेसमधूनच होऊ लागला आहे.
बंटी शेळके यांनी नाना पटोलेंच्या विरोधात खुली भूमिका घेतली. पटोलेंनी मध्य नागपुरात माझ्यासाठी काँग्रेसचे संघटन उभे केले नाही. मी अपक्ष उमेदवाराप्रमाणे लढलो. त्या उलट पटोले हे संघाचे एजंट म्हणून काम करत होते, असा जोरदार आरोप बंटी शेळके यांनी केला होता. एवढेच नव्हे तर पराभूत आमदारांच्या बैठकीत त्यांनी पटोलेंच्याच उपस्थितीत त्यांच्यावर गंभीर आरोप केले. त्याची पक्षाने गंभीर दखल घेतली आणि नोटीस बजावली.
काँग्रेसची स्थिती गंभीर
भाजप सरकारच्या विरोधात आवाज उठवला की ईडी, सीबीआयचे छापे पडतात, असा आरोप काँग्रेस सातत्याने करत असते. मात्र, आता काँग्रेसमध्येच आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे, असे चित्र दिसत आहे. नरेंद्र जिचकार यांनी गेल्यावर्षी नाना पटोलेंना भर बैठकीत प्रश्न विचारला होता. त्याची शिक्षा ते अजूनही भोगत आहेत. ‘एक व्यक्ती एक पद’ असा नियम काँग्रेसमध्ये असल्याची आठवण त्यांनी पटोलेंना करून दिली होती. त्यासोबतच विकास ठाकरे हे आमदार आहेत आणि शहराध्यक्षही आहेत. त्यांची टर्म संपली आहे, याचीही आठवण करून दिली होती. त्यानंतर जो गोंधळ झाला तो सर्वांना माहिती आहे. पण सहा वर्षांसाठी जिचकारांना पक्षातून निलंबित करण्यात आले.
राजेंद्र मुळक यांनी रामटेकमधून उमेदवारी मागितली. मात्र हा मतदारसंघ उद्धव ठाकरे गटाकडे गेला. मुळक अपक्ष लढले. पण त्यांच्यासोबत काँग्रेसचेच नेते मैदानात उतरले. केदार आणि बर्वे यांनी मुळकांसाठी प्रचारसभा घेतल्या. त्यांच्यावर कारवाई झाली नाही. मुळकांनाच सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आली. तशीच स्थिती काटोलमधून अपक्ष लढणारे याज्ञवल्क्य जिचकार यांची आहे. त्यांनीही उमेदवारी मागितली. पण अपयश आल्यामुळे बंडखोरी केली. त्यासाठी त्यांनाही सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले.
विकास ठाकरे..
नागपूर शहरात विकास ठाकरे हा एकमेव चेहरा काँग्रेसकडे आहे. बंटी शेळके यांच्या निमित्ताने एक नवा नेता भविष्यात तयार होऊ शकतो. याज्ञवल्क्य जिचकार यांना वडिलांकडून संस्कार मिळाले आहेत. ते देखील काँग्रेसचे जिल्ह्यातील भविष्य ठरू शकतात. मुळक यांचे कुटुंब काँग्रेसचे निष्ठावान आहेत. त्यांचे वडील आणि ते स्वतः देखील काँग्रेसचेच आमदार होते. पूर्वीचे नेते विलास मुत्तेमवार, सतीष चतुर्वेदी, गेव्ह आवारी यांचा प्रभाव आता कमी झाला आहे. अशात तरुण नेत्यांनाही निलंबित केले, तर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे अस्तित्वच राहणार नाही, अशी भीती आता काँग्रेसमध्ये व्यक्त होत आहे.