महाराष्ट्र

Bunty shelke : नाना पटोले देवडिया भवनला कुलूप लाऊन चाबी घेऊन पळून गेले 

Nana Patole : बंटी शेळकेंचा पुन्हा एक गंभीर आरोप

Congress : मध्य नागपुरातील काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. भाजप – महायुतीचे उमेदवार प्रवीण दटके येथून निवडून आले. त्यानंतर बंटी शेळके यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केला. ‘नाना पटोले आरएसएसचे एजंट आहेत’, या त्यांच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. 

काल (2 डिसेंबर) बंटी शेळके यांनी महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांची बैठक काँग्रेसच्या देवडिया भवन येथे आयोजित केली होती. पण तेथे पोहोचल्यावर देवडिया भवनला कुलुप होते. त्यामुळे शेळके यांनी बाहेरच बैठक घेतली. आम्ही बैठक घेत असल्याचे माहिती पडल्यावर नाना पटोले येथे आले आणि देवडिया भवनला कुलुप लावून चाबी घेऊन पळून गेले, असा गंभीर आरोप शेळके यांनी केला.

बंटी शेळके राहुल गांधी यांच्या युथ ब्रिगेडचे सदस्य आहेत. त्यांना युवक काँग्रेसच्या कोट्यातून उमेदवारी मिळाली होती. काँग्रेसच्या महाराष्ट्रातील बड्या नेत्यांनी आपल्याला लढण्यासाठी पक्षाचे चिन्ह दिले. पण साथ दिली नाही, असा आरोप शेळके यांनी यापूर्वी केलेला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यामुळेच मध्य नागपुरात काँग्रेसचा पराभव झाला, असा ठपकाही शेळके यांनी ठेवला आहे. नाना पटोले यांच्या विरोधात त्यांनी उघड विरोधाची भूमिका घेतल्यामुळे वातावरण ढवळून निघाले आहे. त्यांना पक्षातर्फे कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे.

सतरंज्या उचलणाऱ्यांची वेळ आली

मी काँग्रेसमध्ये अनेक वर्षे सतरंज्या उचलल्या. पण राहुल गांधी यांनी मला 2019 आणि 2024 अशी दोन वेळा उमेदवारी दिली. या निवडणुकीत मध्य नागपुरातून काँग्रेसचा पराभव झाला. पण निवडणुकीत ज्या कार्यकर्त्यांनी अपार कष्ट उपसून मला 80,000 मतं मिळवून दिली, त्या कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणजे महानगरपालिकेची निवडणूक येत्या जानेवारी – फेब्रुवारी महिन्यात होऊ घातली आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षासाठी मेहनत घेतली. आता त्यांच्यासाठी मेहनत घेऊन त्यांना महानगरपालिकेत पोहोचवण्याची वेळ आली आहे. गेले कित्येक वर्ष सतरंज्या उचलल्याचे फळ त्यांना देण्याची वेळ आली आहे, असे बंटी शेळके देवडिया भवनच्या बाहेर माध्यमांशी बोलताना म्हणाले.

Bunty Shelke : नाना पटोलेंबद्दल वक्तव्यानंतर काँग्रेसकडून नोटीस 

कापलं तरी रक्तातून काँग्रेस निघेल

आरएसएसचे एजंट नाना पटोले यांनी विधानसभा निवडणुकीत माझ्या पाठीत सुरा खुपसण्याचे काम केले. ज्यांना कापलं तरी त्यांच्या रक्तातून काँग्रेस निघेल, असे कायकर्ते संघटनेचे काम करतात. त्यांच्या पाठीतही सुरा खुपसण्याचे काम होते आहे. महानगरपालिकेची निवडणूक जवळ आली आहे. अशा परिस्थितीत निवडणुकीच्या अनुषंगाने एकही आढावा बैठक घेण्यात आली नाही. आम्ही बैठक घेतली तर नाना पटोले देवडिया भवनला कुलूप लावून पळून गेले. प्रदेशाध्यक्षांची ही निती आता खपवून घेतली जाणार नाही, असेही बंटी शेळके यांनी सांगितले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!