Nagpur Central Election : मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक पराभूत झालेल्या बंटी शेळके यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर आरोप केले होते. नाना पटोले हे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हस्तक असल्याचा आरोप शेळके यांनी केला होता. त्यांच्या या आरोपांनंतर आता काँग्रेसने शेळके यांच्या विरोधात कारवाई सुरू केली आहे.
ऋषिकेश उर्फ बंटी शेळके यांना काँग्रेसकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. खुलासा करण्यासाठी बंटी शेळके यांना दोन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या दोन दिवसात बंटी शेळके यांना खुलासा सादर करावा लागणार आहे. प्रदेश काँग्रेसने बंटी शेळके यांच्याकडे नाना पटोले यांच्या संदर्भात असलेले पुरावे देखील सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
कारवाई शक्य
मुंबई येथील टिळक भवन येथे काँग्रेसच्या नवनियुक्त आमदारांची बैठक झाली. या बैठकीला महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला उपस्थित होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे देखील बैठकीला हजर होते. बैठकीदरम्यान बंटी शेळके यांनी टिळक भवनाबाहेर प्रसार माध्यमांशी संवाद साधला. हा संवाद साधताना त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले.
नाना पटोले यांच्यामुळे मध्य नागपुरात काँग्रेसचा पराभव झाला असा आरोपही बंटी शेळके यांनी केला. निवडणुकीच्या प्रचारात आपल्याला काँग्रेसकडून कोणतीही सहकार्य मिळाले नाही असे देखील त्यांनी सांगितले. बंटी शेळके यांच्या या आरोपांनंतर त्यांच्यावर कारवाई होईल हे निश्चित मानले जात होते. मात्र बंटी शेळके हे राहुल गांधी यांच्या अनेक आंदोलनांमध्ये सहभागी झाल्याने त्यांना सुरुवातीला नोटीस बजावण्यात आली आहे.
Bunty Shelke : जन्माच्या आधीपासूनच अभिमन्यू प्रमाणे माझ्यावर काँग्रेसचे संस्कार
बंटी शेळके यांनी या नोटीसला समाधानकारक उत्तर न दिल्यास त्यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई अटळ आहे. काँग्रेस मधून आपल्याला काढण्यात आले तरी आपण राहुल गांधी यांच्या सोबतच राहणार असल्याचे शेळके यांनी आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे काँग्रेस मधून काढले गेले तरी शेळके हे काँग्रेससाठीच काम करतील असे सांगण्यात येत आहे. मध्य नागपुरातील निवडणूक यंदा चांगलीच चुरशीची झाली होती. एकीकडे विद्यमान आमदार प्रवीण दटके आणि संघाची पूर्ण ताकद होती. दुसरीकडे बंटी शेळके हे एकट्याने लढत होते. त्यामुळे याप्रकरणी आता काय कारवाई होते, याकडे आता नागपूरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.