Buldhana zp : बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी मुंबई येथील गुलाब खरात यांची नियुक्ती झाली आहे. 2013 च्या आयएएस बॅचचे अधिकारी गुलाब खरात शिवशाही पुनर्वसन प्रकल्प मुंबईच्या व्यवस्थापकीय संचालकपदी होते. अवर मुख्य सचिव व्ही राधा यांनी एका आदेशान्वये खरात यांच्या नियुक्तीचे आदेश काढले आहेत. कुलदीप जंगम यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी कोण येणार, याची उत्सुकता होती. ही प्रतीक्षा गुलाब खरात यांच्या रूपाने संपली आहे. जंगम यांची तीन महिन्यातच बदली झाली. त्यामुळे विविध तर्क वितर्कांना उधाण आले होते. विशेष म्हणजे ठाकरे गटाचे नेते जालिंदर बुधवत यांनी जंगम यांच्या बदलीला स्थगिती द्यावी, अशी मागणी राज्य शासनाकडे केली होती.
एकाच वर्षात तीन
बुलढाणा येथील जिल्हा परिषदेला एका वर्षात तीन मुख्य कार्यकारी अधिकारी मिळाले. या महत्त्वपूर्ण पदाचा एक प्रकारे खेळ होत असल्याचे बोलले जात आहे. या निमित्ताने सत्ताधार्याकडे अंगुलीनिर्देश करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांची बदली झाल्यानंतर येथे विशाल नरवाडे आले. जिल्ह्यातीलच तरूण आयएएस अधिकारी या पदावर रूजू झाला होता. त्यांनी कामाचा धडाका देखील लावला होता.
ते जिल्ह्यातील रहिवासी आहेत. लोकसभा निवडणुकीची वेळ पाहता त्यांना जिल्ह्यात ठेवू नये, अशा प्रकारचा सूर उमटला होता. तशी तक्रारदेखील काही संघटनांनी केली होती. त्यामुळे दोन महिन्यातच त्यांची बदली करण्यात आली. त्यानंतर शुभम गुप्ता यांची नियुक्ती झाली. परंतु ते रूजू झालेच नाही. तीन महिन्यांपूर्वी कुलदीप जंगम मुख्य कार्यकारी अधिकारीपदी आले होते. परंतु विधानसभा निवडणुका पाहता, त्यांचीदेखील बदली करण्यात आली आहे.
Tractor Allocation Scheme : आदिवासी परिषदेचा जिल्हाधिकाऱ्यांवर इशारा!
सीईओ म्हणून बी. एम. मोहन
दरम्यान, प्रभारी म्हणून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन यांनी चांगले काम पाहिले. पण मुंबई येथील शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक गुलाब खरात यांची बुलढाणा जिल्हा परिषदेच्या सीईओ पदी शासनाने नियुक्ती केली. एक शिस्तीचा अधिकारी म्हणून त्यांची प्रशासनात ओळख आहे. आता तेसुद्धा रूजू होतात की नाही, झाले तर किती दिवस राहतात, याबाबत जिल्हा परिषद वर्तुळात चर्चा ऐकायला सुरू आहे. एका वर्षात झेडपीला तीन सीईओ मिळाले आहेत. एवढ्या महत्त्वाच्या पदाचा खेळ मांडल्याच्या भावना जिल्ह्यात उमटत आहेत.