Assembly Election : येणाऱ्या निवडणुकीत आम्हाला भरभरुन आशीर्वाद दिला तर दीड हजार रुपयांचे तीन हजार रुपये होतील. पण आशीर्वाद दिला नाही तर मी पण तुमचा भाऊ आहे, हे दीड हजार रुपये परत घेईन, असे विधान बडनेराचे आमदार रवी राणा यांनी केले. त्यानंतर रवी राणा यांच्यावर या वक्तव्यामुळे चौफेर टीका होत आहे. काँग्रेस आणि भाजपनेही राणा यांच्या हल्लाबोल केला आहे. राणा यांना महायुतीच्या बैठकीचे निमंत्रण देणेही टाळण्यात आले आहे. अशात राणा यांच्या विधानाचा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे.
रवी राणा हे नेहमीच महाराष्ट्राची थट्टा करीत असतात. अमरावतीमध्ये नवनीत राणा यांचा झालेला पराभव ही थट्टा नव्हती. लोकांनी त्यांना शहाणपणाने केलेले मतदान होते. त्यानंतरही राणा यांनी महिला, माता-भगिनींची थट्टा केली असेल तर त्यांचा याची शिक्षा मिळेल. राणा यांनी ही थट्टा केलेली नाही. ती निवडणुकीसाठी केलेली नौटंकी आहे. रवी राणा हे यापुढे विधानसभेत नसतील, असेही राऊत यांनी सांगितले. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे राऊत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत, उपजिल्हा प्रमुख अविनाश दळवी, योगेश पल्हाडे, दिनेश शिंदे आदींची उपस्थित होते.
पक्षाकडून आढावा
मंगळवारी (ता. 13) बुलढाणा जिल्ह्यातील शेगावात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेकडून पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. यासाठी संजय राऊत हे बुलढाणा आणि अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. देशात आमदारांच्या वाहनांवर हल्ले होत आहेत. त्यावर राऊत म्हणाले, नरेंद्र मोदी, अमित शाह यांनी दिल्लीत आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत घातक पायंडा पडला आहे. विरोधक राजकीय वैचारिक शत्रू नाही तर व्यक्तीगत दुश्मन समजले जात आहे. याच समजुतीतून त्यांच्यावर हल्ले होत आहे. गुन्हा दाखल करण्यात येत आहे. खटले चालविले जात आहेत, असे संजय राऊत म्हणाले.
मुनव्वर फारुकी या हास्य अभिनेत्याच्या वक्तव्याबाबतही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘स्टॅन्डअप’ विनोद करणारे मुनव्वर फारुकी याने मराठी माणसाची आणि मालवणी समाजाची माफी मागितली आहे. त्यांनी नाक घासले आहे. हसन मुश्रीफ यांच्या वक्तव्यावरही राऊत यांनी बोलताना सांगितले की, महाविकास आघाडी विरोधकांचा पराभव करणार आहे. मंगळवारी राऊत यांनी बुलढाणा व अकोल्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर दोन्ही जिल्ह्यातील पक्षाच्या कामाचा आढावा घेतला. भेटीदरम्यान काही नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी नाराजी ही व्यक्त केली.