महाराष्ट्र

Buldhana Protest : कोलकात्यातील घटनेच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च

Kolkata Case : भाजपच्या महिला आघाडीकढून घटनेचा निषेध

कोलकात्यातील मेडिकल कॉलेजमधील निवासी महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेचे पडसाद संपूर्ण देशात उमटताना दिसत आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील शेगावातही या घटनेच्या निषेधात लोक रस्त्यावर उतरले आहेत. शहरातील भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीने शुक्रवारी (दि.१६) रात्री आठच्या सुमारास शहरातून कँडल मार्च काढून घटनेचा निषेध नोंदवला.

9 ऑगस्ट शुक्रवार रोजी कोलकात्यामधील राज्य संचालित आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली होती. महाविद्यालयाच्या आपत्कालीन इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील सेमिनार हॉलमध्ये सकाळी 11.30 च्या सुमारास महिलेचा मृतदेह सापडला. ती गुरुवारी रात्रीच्या ड्युटीवर होती. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पीडितेच्या पालकांना फोनवर बोलून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.

या प्रकरणाच्या चौकशीसाठी 11 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. आरजी कर मेडिकल कॉलेजचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय वशिष्ठ म्हणाले, ‘पोलिसांना माहिती देण्यात आली असून व्हिडिओ पोस्टमार्टम करण्यात येणार आहे. सत्य बाहेर यावे अशी आमची इच्छा आहे. दरम्यान पीडितेच्या शरीरावर 10 जखमा आढळून आल्या आहेत. गळा दाबून मारल्याचे शवविच्छेदन अहवालातून समजले आहे.’

या घटनेचा संपूर्ण देशात निषेध व्यक्त केला जातोय. महाराष्ट्रात विविध राजकीय पक्षांनी मोर्चे आणि आंदोलन करून निषेध नोंदवत आहेत. दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील शेगावात शुक्रवारी रात्री भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीकडून कँडल मार्च काढून या घटनेचा निषेध नोंदवला. महिला अध्यक्ष अरुणा जोशी यांच्या नेतृत्वात शहरातील माहेश्वरी भवन ते गांधी चौकापर्यंत कॅन्डल मार्च काढण्यात आला.

आज डॉक्टरांचा राष्ट्रव्यापी बंद!

कोलकातामध्ये डॉक्टर महिलेची लैंगिक अत्याचार करुन निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर कोलकातासह देशभरातील डॉक्टरांनी आज संप पुकारला आहे. या घटनेचा तीव्र निषेध करत तातडीनं कारवाई करण्याची मागणी डॉक्टरांनी केली आहे. याचे पडसाद महाराष्ट्रातही दिसून आले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील सर्वच डॉक्टरचे आजपासून काम बंद आंदोलन असल्यामुळे ओपीडीला फटका बसण्याची शक्यता आहे. शनिवारी सकाळपासून तर रविवारी सकाळपर्यंत हे आंदोलन राहणार आहे. आपत्कालीन विभाग वगळता इतर विभागात काम न करण्याचा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!