महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्याला अॅड. आकाश फुंडकर यांच्या रूपाने सहावे कॅबिनेट मंत्रिपद मिळाले आहे. जिल्ह्याच्या इतिहासात आतापर्यंत 11 जणांना राज्याच्या मंत्रिमंडळात सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. वडिल स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्यानंतर त्यांचे सुपूत्र आकाश फुंडकर यांना कॅबिनेट मंत्रिपदी विराजमान होण्याचा योगायोगही यात साधला गेला आहे.
विशेष म्हणजे 1980 मध्ये भाजपच्या कमळ चिन्हावर निवडून येत स्व. पांडुरंग फुंडकर आणि किसनलाला संचेती यांनी विदर्भात भाजपची पाळेमुळे रुजविण्यात मोठी भूमिका निभावली होती. त्यानंतर योगायोगाने वडिलांच्या निधनानंतर सहा वर्षांनी अॅड. आकाश फुंडकर यांना राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून स्थान मिळाले आहे. गेल्या 47 वर्षांतील ते 11 वे मंत्री ठरले आहेत.
कॅबिनेट मंत्रिपदाचा विचार करता आजपर्यंत बुलढाणा जिल्ह्यात आणीबाणीच्या काही महिन्यांपूर्वी अर्जुनराव कस्तुरे यांना समजाकल्याण, त्यांच्यानंतर भारत बोंद्रे यांना पाटबंधारे, डॉ. राजेंद्र शिंगणे यांना आरोग्य व कुटुंबकल्याण व नंतर अन्न व औषध प्रशासन आणि पांडुरंग फुंडकर यांना कृषी व फलोत्पादन तर डॉ. संजय कुटे यांना कामगार कल्याणमंत्री म्हणून कॅबिनेट मंत्रिपद मिळाले होते. आता आकाश फुंडकर यांनीही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यांना कोणते खाते मिळणार, याबाबत उत्सुकता ताणली गेली आहे.
अर्जुन कस्तुरे जिल्ह्यातील पहिले मंत्री
अर्जुन कस्तुरे हे जिल्ह्यातील पहिले मंत्री ठरले होते. आणीबाणीच्या आधी त्यांची वर्णी लागली होती. त्यानंतर कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसलेले रामभाऊ लिंगाडे यांना गृहराज्यमंत्रिपद (1978) वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना मिळाले होते. तपोवनकर शिवाजी पाटील यांना पाटबंधारे राज्यमंत्री म्हणून पुलोदच्या अर्थात शरद पवार मुख्यमंत्री असताना स्थान मिळाले होते.
1980 मध्ये पुन्हा शरद पवार मुख्यमंत्री असताना भारत बोंद्रे यांना पाटबंधारे कॅबिनेट मंत्रिपद मिळाले. 1991 मध्ये मेहकरचे सुबोध सावजी महसूल राज्यमंत्री म्हणून सुधाकर नाईक यांच्या मंत्रिमंडळात होते. त्यांच्या पाठोपाठ शिवसेनेतील पहिल्या बंडात महत्त्वाची भूमिका बजावणारे डॉ. राजेंद्र गोडे यांना उपमंत्रिपद दिले गेले होते. 1997-98 मध्ये विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री असलेले प्रतापराव जाधव यांना पाटबंधारे राज्यमंत्रिपद दिले गेले होते. अलीकडील काळात डॉ. राजेंद्र शिंगणे यांना आरोग्य व कुटुंबकल्याण, अन्न व औषध प्रशासन खाते दिले गेले होते. 2016 ते 2018 दरम्यान पांडुरंग फुंडकर यांना कृषिमंत्री व त्यांच्यानंतर डॉ. संजय कुटे यांना कामगार मंत्री म्हणून कॅबिनेट मंत्रिपदी काम करता आले.
खामगावात जल्लोष
अॅड. आकाश फुंडकर यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच पदाधिकारी- कार्यकर्त्यांनी शहरातील भाजप कार्यालयासमोर एकच जल्लोष केला. पदाधिकारी व कार्यकत्यांनी एकत्रित येत फटाके फोडून आनंद व्यक्त केला, तर महिला पदाधिकाऱ्यांनी डीजेच्या संगीताच्या तालावर ठेकाही धरला. भाजपाकडून नवीन आणि तरुण चेहयांना संधी दिल्याने जिल्ह्यात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. महिला पदाधिकारी व कार्यकत्यांनी हर्षोल्हासात डीजेच्या तालावर चांगलाच ताल धरला. यावेळी पक्ष कार्यालयासमोर शपथविधीचा कार्यक्रम पाहण्यासाठी कार्यकत्यांनी एकच गर्दी केली, तर खामगाव-नांदुरा रस्त्यावर यावेळी दोन्ही बाजूने गर्दी झाली होती.