Buldhana : केंद्रीय आयुष व कुटुंब आरोग्य कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी संध्याकाळी उशिरापर्यंत अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांचा आढावा घेतला. त्याचवेळी रखडलेले सर्व प्रकल्प तातडीने पूर्ण करा, असे निर्देश प्रशासनाला दिले.
बुलढाणा जिल्हा नियोजन सभागृह येथे त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची प्रलंबित कामे पूर्ण करा. जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना लाभ मिळावा, अश्या सूचना त्यांनी दिल्या. शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विम्याची रक्कम तातडीने जमा करण्यासाठी पिक विमा कंपनीला निर्देश देण्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या.
प्रतापराव जाधव शनिवारी (दि.२०) जिल्हा दौऱ्यावर होते. जिल्हा बँकेच्या वतीने आयोजित सत्कार सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यानंतर दुपारी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात प्रशासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. संध्याकाळी उशिरापर्यंत ही बैठक चालली. यावेळी सर्वच विभागातील अधिकारी उपस्थित होते.
आरोग्य, कृषी, पीक कर्ज, आपत्ती व्यवस्थापन, वीज वितरण, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, प्रधानमंत्री आवास योजना अश्या विविध योजनेचा आढावा यावेळी घेतला. संबंधित विभागातील रखडलेली कामे त्वरित पूर्ण करण्याचे आदेश जाधव यांनी अधिकाऱ्याला दिले.
‘लाडकी बहीण’ योजना यशस्वी करा
राज्य शासनाची ‘माझी लाडकी बहीण’ योजना यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करावे. सुविधा केंद्रांना आता प्रति अर्जामागे 50 रुपयांचा लाभ मिळणारा असल्याने त्यांच्याकडून प्राधान्याने अर्ज भरून घेण्यात यावे. तसेच युवकांसाठी युवा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याने उद्योग आणि युवकांची सांगड घालून योजना यशस्वी करावी, असेही ते अधिकाऱ्यांना म्हणाले.
नियमित पाठपुरावा करा
महावितरणतर्फे कुसुम आणि पीएम सुर्यघर योजना राबविण्यात येत आहे. या योजनांचा लाभ नागरिकांना आणि शेतकऱ्यांना होणार आहे. या योजनेचे लाभ तातडीने देण्याची व्यवस्था करावी. यासोबतच जाधव यांनी आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, जलजीवन मिशन, महात्मा गांधी रोजगार हमी योजना, सार्वजनिक बांधकाम भारत संचार निगम लिमिटेड आणि आरोग्य विभागाचा आढावा घेतला. येत्या काळात राबविण्यात येणाऱ्या योजनांचा पाठपुरावा करून ही कामे तातडीने पूर्ण होईल, यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.