राष्ट्रवादीमध्ये फुट पडल्यानंतर माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी साहेबांची साथ सोडली. आणि दादांच्या गटात सामील झाले. जिल्हा बँकेला पुन्हा उभारणीसाठी मदत करण्याचे आश्वासन मिळाले. त्यामुळे दादांसोबत गेल्याचे डॉ. शिंगणेंनी जाहीर केले होते. आता दादांनी दिलेला शब्द पूर्ण केला आहे. बुलढाणा जिल्हा बँकेस ३०० कोटींचे सॉफ्ट लोन मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे आता या बँकेतून शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
३०० कोटींचे सॉफ्ट लोन दिल्याने या बँकेला ऊर्जितावस्था मिळेल, असा विश्वास शिंगणेंना होता. त्यामुळे त्यांनी अजितदादांकडे मागणी केली होती. दादांनी निर्णय घेऊन वचनपूर्तता केली आहे. हे लोन मिळाल्याने बळीराजाला दिलासा मिळणार असेल शरद पवारांची साथ सोडेन, अशी अट डॉ. शिंगणे यांनी घातली होती. त्यानुसार, आता बँकेला ३०० कोटी रूपये मिळाले आहेत.
काही दिवसांपूर्वी डॉ. शिंगणे हे शरद पवारांच्या ‘तुतारी’ चिन्हावर विधानसभा लढवतील, अशी शक्यता बळावली होती. परंतु, अजितदादांनी शब्द पूर्ण केल्याने या शक्यतेला आता पूर्णविराम बसला आहे.
जिल्हा केंद्रीय सहकारी बँक
काही दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा केंद्रीय सहकारी बँक आर्थिकदृष्ट्या संकटात आली होती. बँकेला सॉफ्ट लोन मिळावे, यासाठी स्थानिक नेत्यांकडून युद्धस्तरावर प्रयत्न सुरू होते. बँकेची स्थिती खालावल्याने याचा परिणाम शेतकर्यांच्या पीककर्ज वितरणावर झाला होता. परंतु, आता पेरणीच्यावेळी बँकेला घसघशीत तीनशे कोटीचे सॉफ्ट लोन मिळाल्याने बळीराजासाठी ही शुभवार्ता ठरत आहे. यामुळे बँकेची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होणार आहे.
आर्थिक संकटातून सावण्यासाठी
जिल्हा बँकेने आर्थिक स्थिति सुधारणेसाठी ३०० कोटीचा सॉफ्ट लोन मिळण्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठविला होता. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेत झालेल्या सभेमध्ये राज्य सहकारी बँकेने सॉफ्ट लोन द्यावे, असा प्रस्ताव मांडला. मंत्रिमंडळाच्या ११ मार्चच्या बैठकीत निर्णय झाला. त्यानुसार, बुलढाणा जिल्हा बँकेची आर्थिकस्थिती विचारात घेऊन, बँकेच्या प्रगतीचे अवलोकन करता, बँकेस महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून ३०० कोटी सॉफ्ट लोन उपलब्ध होण्यासाठी शासनाने हमी घेतली आहे.