Buldhana Constituency : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप आणि राजी-नाराजीचे सूर उमटत आहेत. बुलढाणा जिल्ह्यात महायुतीमध्ये शिवसेनेच्या प्रतापरावांना उम्मेदवारी देऊ नका. जाधव यांना उमेदवारी दिल्यास काम करणार नसल्याचा इशारा भाजपच्या पदाधिकऱ्यांनी दिला आहे. महाविकास आघाडीमध्येही संभाव्य उमेदवार प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्या विरोधात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. अशात आता बुलढाणा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा व माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांना उमेदवारी द्यावी, ही मागणी पदाधिकार्यांनी नागपूर येथे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले तथा जिल्ह्याच्या संपर्क प्रमुख माजी मंत्री आमदार यशोमती ठाकूर यांच्याकडे केली आहे.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी आश्वासन देत सबुरीचा सल्ला सर्वांना दिला आहे. याबाबत आपण काँग्रेस पक्षातील नेतृत्वाशी चर्चा करू, असे आश्वासन दोघांनीही दिले आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनीदेखील नवी दिल्लीत वरिष्ठ नेतृत्वाला भेटून बुलढाणा मतदारसंघ काँग्रेसकडे घेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. नागपुरात वर्धा मार्गावरील रहाटे कॉलनीमधील पटोले यांच्या निवासस्थानी बुलढाण्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. रिजवान सौदागर, दत्ता काकस, गजानन मामलकर, सुनील तायडे यांनी कार्यकर्त्यांची भावना व भूमिका व्यक्त केली.
जागावाटप प्रलंबित
लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून अद्याप जागावाटप झालेले नाही. तरी बुलढाणा लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे आहे असे समजून शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे नेते कामाला लागले आहेत. ठाकरे यांच्याकडे या जागेसाठी तगडा उमेदवार नसल्याचा आक्षेप काँग्रेसने घेतलेला आहे. त्यामुळेच हा मतदारसंघ काँग्रेसला सोडावा यासाठी जिल्ह्यातील काही काँग्रेस पदाधिकारी राजीनामा देत आहेत. दोन दिवसांपूर्वी जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्याकडे अनेकांनी राजीनामा दिला. त्यानंतर रविवारी जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकार्यांनी प्रदेशाध्यक्ष पटोले आणि पक्षाच्या जिल्हा संपर्क प्रमुख यशोमती ठाकूर यांची भेट घेतली.
वासनिकांचे नीकटवर्तीय शर्यतीत
माजी आमदार तथा काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस हर्षवर्धन सपकाळ यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी गळ आता अनेकांनी घातली आहे. मतदारसंघ वाचविण्यासाठी काँग्रेसकडून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचे परिणाम काय होतात, हे लवकरच समजेल. मेहकर तालुक्यातील काँग्रेसचे नेते व खासदार मुकूल वासनिक यांचे विश्वासू दिगंबर मवाळ यांनी लोकसभेसाठी काँग्रेस पक्षाकड़े उमेदवारी मागितली आहे. जिल्हा काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार मुकूल वासनिक (Mukul Wasnik) यांनी दिल्ली येथे तर प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी 24 मार्चला नागपूर येथे प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, ज्येष्ठ नेते लक्ष्मण घुमरे यांच्यासोबत बुलढाणा लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा केल्याची माहिती आहे.
जयश्री शेळकेंचे काय?
बुलडाणा लोकसभा मतदार संघात महायुती किंवा महाविकास आघाडीकडून उमेदवार कोण, हे अजून ठरलेले नाही. मात्र महाविकास आघाडीकडून ही जागा काँग्रेसच्या वाट्याला आली तर काँग्रेसकडून जयश्री शेळके काट्याची टक्कर देवू शकतात. त्यामुळे उमेदवारीचा गुंता कायम आहे. गेलेतीन टर्म विजय मिळविणारे खासदार प्रतापराव जाधव यांच्या तिकिटाची ‘गॅरंटी’ कमी आहे. मात्र आता खासदार प्रतापराव जाधव हेच महायुतीचे उमेदवार असतील असा दावा केला जात आहे. महाविकास आघाडीत सुद्धा बुलढाण्याच्या जागेसाठी एकमत नाही. काँग्रेस किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यातील कुणाला ही जागा मिळते आणि उमेदवार कोण ठरतो, यावर पुढील समीकरण ठरणार आहे.
हे आहेत संभाव्य उमदेवार
बुलडाणा लोकसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात असलेल्या नावांमध्ये विद्यमान खासदार प्रतापराव जाधव, शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर, काँग्रेसच्या नेत्या जयश्री शेळके, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नरेंद्र खेडॆकर, मिशन वन बुलढाणाचे संदीप शेळके ही नावे चर्चेत आहेत. आता काँग्रेसकडून हर्षवर्धन सपकाळ यांचेही नाव पुढे आले आहे. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या नावावरही चर्चा कायम आहे.