भंडारा जिल्ह्यात पक्षापक्षांत उमेदवारीसाठी उठलेले वादळ क्षमण्याचे नाव घेत नाही. ही बाब पुन्हा एकदा समोर आली आहे. मोहाडी-तुमसर मतदारसंघात शरद पवार गटात उमेदवारीवरून उठलेले वादळ जिल्हावासी अजूनही पाहात आहेत. आता काँग्रेस पक्षामध्येही उमेदवारीवरून वादंग पेटले आहे. काँग्रेसमध्ये हे वादंग भंडारा-पवनी मतदारसंघात उठले आहे.
भंडारा-पवनी मतदारसंघात बौद्ध समाजाला यंदा प्रतिनिधित्व द्यावे, अन्यथा अनुसूचित जातीतील समाजबांधव काँग्रेसच्या विरोधात मतदान करणार, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना देण्यात आला आहे. त्यामुळे काँग्रेसची अनुसूचित जातीची परंपरागत मते जर काँग्रेसला मिळणार नसतील, तर यंदा काँग्रेसची फजिती होणार, हे निश्चित मानले जात आहे.
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती समारोह भंडारा या संघटनेने हा इशारा दिला आहे. संविधान वाचवण्यासाठी अनुसूचित जातीच्या समाज बांधवांनी काँग्रेसला लोकसभेत भरभरून मतदान केले. त्याचा परिणाम म्हणून भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांना लोकसभेत पाठवविले. प्रत्येक निवडणुकीत अनुसूचित जातीने त्यातही बौद्ध समाजाने नेहमी नाना पटोलेची साथ दिली आहे. तसा भंडारा-पवनी मतदारसंघात बौद्ध समाजाचा उमेदवार देण्याचे वचनही नानांनी दिलेले आहे. मात्र नाना पटोले यांनी अद्यापही बौद्ध समाजाचा उमेदवार घोषित केला नाही. त्यामुळे समाजात कमालिची नाराजी आहे.
नानांना इशारा
‘द लोकहित’शी बोलताना विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती समारोह भंडारा संघटनेचे अध्यक्ष विनय बनसोड म्हणाले की, नाना पटोले यांनी भंडारा-पवनी मतदारसंघात एका महिलेला उमेदवारी दिली असल्याची चर्चा रंगली आहे. पती कुणबी असल्याने त्या महिला उमेदवार ओबीसी झाल्या आहेत आम्हाला केवळ अनुसूचित जातीचा बौद्ध समाजाचा उमेदवार हवा आहे. तसा काँग्रेसचा उमेदवार नाना पटोले यांनी द्यावा.
नाना पटोले दिलेल्या शब्दाला जागले नाही, तर भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील अनुसूचित जातीतील समाज काँग्रेस, महाविकास आघाडीच्या विरोधात मतदान करेल, असा इशाराही विनय बनसोड यांनी दिला आहे. 23 ऑक्टोबरला यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन नाना पटोले अनुसूचित जाती विरोधी नाहीत, हे त्यांनी सिद्ध करावे, असे आवाहन संघटना करणार असल्याचेही बनसोड म्हणाले.
नानांची सावध भूमिका
राज्यात काँग्रेस पक्षात नाना पटोले यांच्या विरोधात मराठवाड्याची एक मोठी लॉबी काम करतेय. आधीच ते नाना पटोले यांना कैचीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातही भंडारा-गोंदिया जिल्हातील नाना पटोले अर्थात काँग्रेसची अनुसूचित जातीची परंपरागत, हक्काची मते जर दूर गेली, तर नानांना यंदाची निवडणूक स्वतःसाठी आणि त्यांनी उभे केलेल्या उमेदवारासाठी नक्कीच जड जाईल, यात शंका नाही. त्यामुळे बौद्ध समाजाला नाराज करण्याचे काम नाना पटोले करणार नाहीत. ते नक्की यातून मार्ग काढतील, अशी आशा कार्यकर्त्यांना आहे.