BSP Vs BJP : बहुजन समाज पार्टीने आता नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवाराची घोषणा केली आहे. भाजप आणि काँग्रेसने उमेदवार जाहीर करताच बसपाने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. योगेश लांजेवार यांना नागपुरातून उमेदवारी देऊन बसपाने लढण्याची तयारी केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेसचे उमेदवार आमदार विकास ठाकरे यांच्या विरोधात बसपाने तेली समाजाचा उमेदवार देऊन लढतीत रंगत आणण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र बसपाच्या या ‘हत्ती’ची चाल मतदारांना कितपत आकर्षित करू शकेल, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांपुढे बसपाचे हे बळ किती चालेल याबद्दल शंका उपस्थित होत आहे.
बसपाचे खासदार रामजी गौतम, महाराष्ट्राचे प्रभारी नितीन सिंग, प्रदेशाध्यक्ष परमेश्वर गोणारे, प्रदेश महासचिव सुनील डोंगरे, प्रदेश सचिव दादा उइके, प्रदेश सचिव पृथ्वी शेंडे, जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत रविभवन येथे बैठक घेण्यात झाली होती. त्यानंतर काही नावे मायावती यांच्याकडे पाठविण्यात आली. त्यातून लांजेवार यांचे नाव निश्चित करण्यात आले. बसपाने यापूर्वी नितीन गडकरी यांच्या विरोधात नगरसेवक मोहम्मद जमाल आणि मोहन गायकवाड यांना उमेदवारी दिली होती.
बनवारीलाल पुरोहित यांच्या विरोधात तत्कालीन भाजपचे जिल्हाध्यक्ष बाबुराव वैद्य यांना उमेदवारी देण्यात आली होती. बसपकडून ज्वाला धोटे, नरेंद्र जिचकार यांच्या नावाचाही विचार करण्यात आला. परंतु शेवटी लांजेवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. बसपाच्यावतीने खुल्या प्रवर्गासाठी असलेल्या मतदारसंघातून आतापर्यंत अनुसूचित जाती-जमातीचा उमेदवार देण्यात येत नव्हता. यावेळीही तोच कित्ता गिरवण्यात आला आहे. बसपाने आपल्या मतांचा टक्का वाढविण्याचा आधी प्रयत्न केला. मात्र तो घसरत चालल्याचे आढळल्यावर पुन्हा समीकरण बदलण्यात आले.