Style of Congress : प्रतिभा धानोरकर यांना विजय पदरात पडताच दादागिरी सुरू केल्याचा आरोप होत आहे. काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या भावाने चक्क कोळसा अधिकाऱ्याला शिवीगाळ केली आहे. धानोरकर यांच्या भावाने अधिकाऱ्याला जाब विचारत हा प्रकार केला आहे. भावाने केलेल्या या कृत्याचे शिंतोडे शेवटी खासदार धानोरकर यांच्यावरच उडाले आहेत.
प्रवीण काकडे असे अधिकाऱ्याला शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या समक्ष त्यांचे सख्खे भाऊ प्रवीण काकडे यांनी हा प्रकार केला आहे. काकडे आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटक एम्टा कोळसा खाणीच्या अधिकाऱ्यांना अश्लील शिवीगाळही केली. हा प्रकार जेवढा धक्कादायक आहे, तेवढाच संतापजनक आहे. या घटनेमुळे भद्रावती येथे खळबळ उडाली आहे. बरांज येथील ही घटना आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनीही काकडे आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अडविण्याची हिंमत दाखविली नाही.
व्हिडीओ व्हायरल
निवडणूक आटोपताच आता चंद्रपुरातील खरे राजकारण पुढे आले आहे. मारहाणीचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात कर्नाटक एम्टा कोळसा खाण आहे. कर्नाटक सरकारच्या मालकीची ही खाण आहे. विशेष म्हणजे कर्नाटकमध्ये काँग्रेसचेच सरकार आहे. खाणीतील कोळसा वाहतुकीमुळे पिकांना मोठा फटका बसत आहे. प्रकल्पग्रस्तांचा प्रश्नही प्रलंबित आहे. या प्रश्नांना घेवून खासदार प्रतिभा धानोरकर व्यवस्थापनासोबत चर्चा करण्यासाठी बुधवारी (ता. 19) जून रोजी खाण परिसरात गेल्या होत्या. त्यांच्यासोबत भाऊ प्रवीण काकडे आणि असंख्य कार्यकर्ते व प्रकल्पग्रस्त देखील होते.
चहापेक्षा केटली गरम
अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असतानाच खासदार धानोरकर यांच्याऐवजी त्यांचा भाऊ प्रवीण काकडे हा स्वत: लोकप्रतिनिधी असल्याच्या अविर्भावात अधिकाऱ्याला जाब विचारत होता. अधिकाऱ्यांशी चर्चा करता-करता प्रवीण काकडे यांनी शिवीगाळ केली. त्याचवेळी एका व्यक्तीने त्या अधिकाऱ्याच्या कानशिलात थापड लगावली. त्यानंतर लगेच गोंधळाला सुरुवात झाली. खरे तर काकडे हा खासगी व्यक्ती आहे. त्याला अधिकाऱ्यांना जाब विचारण्याचा तसा कोणताही अधिकारी नाही. या चर्चेत धानोरकर यांनाच पुढाकार घेऊ द्यायला हवा होता. अधिकाऱ्यांनी कोणताही असभ्यपणा न करता काकडे याने दाखविलेल्या आगाऊपणामुळे प्रतिभा धानोरकर यांची प्रतिमा खराब झाली आहे.
Bhandara Gondia : ठरलं… पहिल्याच अधिवेशात डॉ. पडोळे उचलणार ‘हा’ मुद्दा
उपस्थित पोलिसांनी परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्याला फार यश आले नाही. यावेळी एकच गोंधळ उडाल्याने व संतप्त जमाव अधिकाऱ्यांना मारहाण करतो की काय अशी स्थिती निर्माण झाल्याने पोलिसांच्या मदतीने अधिकाऱ्यांना कसेबसे बाहेर काढण्यात आले. अधिकारी कोणताही असो त्यांच्याशी चर्चा करताना एक मर्यादा असते. लोकप्रतिनिधी ही मर्यादा पाळतात. परंतु काकडे या धानोरकर या केवळ ‘रबरस्टॅम्प’ सारख्या खासदार आहेत. खरी ‘पावर’ आपल्याकडेच आहे असा गैरसमज झाला असावा, असा आरोप आता होत आहे. कर्नाटक एम्टा खाण व्यवस्थापनाचे उपाध्यक्ष जीभकाटे यांनी, यावर बोलण्यास नकार दिला.
वारे डोक्यात शिरले
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला बऱ्यापैकी यश मिळाले आहे. त्यामुळे कदाचित विजयचा उन्माद आणि वारे डोक्यात शिरल्याचा हा नमुना असावा. मागील दहा वर्षांपासून धानोरकर कुटुंबाचे सदस्य लोकप्रतिनिधी असताना त्यांना प्रकल्पग्रस्तांच्या विविध समस्या सोडविण्यात यश आले नाही. अशात काकडे याचे आज चमकोगिरी करून काय मिळविले असा प्रश्न आहे. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न तर सुटलेच नाही उलट त्यांना पोलिसांनी बाहेर काढावे लागले. त्यामुळे दहा वर्षापासून एकही विकास काम न करणारे धानोरकर प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवायला गेले होते की यूपी, बिहार स्टाइल गुंडगिरी करायला असा प्रश्न उपस्थित होत आहे.