महाराष्ट्र

Lok Sabha Election : लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी इंडिया आघाडीची सत्ता आणा

Latur Constituency : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे आवाहन

Congress News : काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. स्वातंत्र्यानंतर देशात विविध क्षेत्रात विकासाची कामे केली. त्यामुळे देशाने विज्ञान, तंत्रज्ञान, कृषी, आरोग्य, शिक्षण, जलसंपदासह सर्वच क्षेत्रात प्रगती केली. काँग्रेसने जे उभे केले ते सर्व पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विकून टाकले. देश विकून देश चालवला. 205 लाख कोटी रुपयांचा कर्जाचा डोंगर उभा करुन ठेवला. भाजपाने जाती धर्माच्या नावावर भांडणे लावून सामाजिक शांतता बिघडवण्याचे पाप केले. लोकसभेची ही निवडणूक देशाच्या स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे.लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी इंडिया आघाडीची केंद्रात सत्ता आणा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केले.

लातूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस इंडिया आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ अहमदपूर तालुक्यातील रोकडा सावरगाव येथे आयोजित सभेत ते बोलत होते. सभेला माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, आमदार वजाहत मिर्झा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री विनायक पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लातूर जिल्हा प्रमुख बालाजी रेड्डी, अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे निरीक्षक माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे आदी उपस्थित होते.

समाजात तेढ निर्माण केली

भाजपा सरकारवर टीका करत नाना पटोले म्हणाले की, भाजपने मराठा, ओबीसी, धनगर, आदिवासी समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले. पण त्यांनी आरक्षण दिले नाही. उलट राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी वाद लावला. भारतीय जनता पक्ष व आरएसएस हे आरक्षण विरोधी आहेत. नरेंद्र मोदी यांची पुन्हा सत्ता आली तर ते संविधान बदलणार. संविधानाने दिलेले आरक्षणही संपविणार. भाजपने 2014 मध्ये खोटी आश्वासने देऊन सत्ता मिळवली. 2019 मध्ये पुलवामा येथे हल्ल्यात 40 जवान शहिद झालेत. हा हल्ला कोणी त्याचा तपास आजही लागलेला नाही. मोदी सरकारने जीएसटीच्या माध्यमातून जनतेकडून वसुली केली. अदानी, अंबानीचे घर भरले. कांदा निर्यात बंदी उठवताना गुजरातची उठवली. महाराष्ट्रातील कांदा निर्यातला परवानगी दिली नाही. भाजपा सरकारने महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला पळवले. राम मंदिर उद्घाटन व संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आमंत्रण न देऊन त्यांचा अपमान केला, असेही नाना पटोले म्हणाले.

काँग्रेसने जनतेला गॅरंटीकार्ड दिले आहे. गरिब महिलांना वर्षाला एक लाख रुपये देणार. 30 लाख सरकारी रिक्त पदे भरणार. शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार. एमएसपीचा कायदा आणणार. शेती जीएसटी मुक्त करणार. जातनिहाय जनगणना करणार, असे नाना पटोले यांनी सांगितले.

Lok Sabha Election : शिरूरच्या अभिनेत्याला शेतात काम करताना पाहिलंय का? 

माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, लातुरात झालेल्या पंतप्रधान मोदींच्या सभेत सामान्य माणसाच्या प्रश्नाबद्दल भाष्य करण्यात आले नाही. मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीतून मेट्रोचे कोच तयार करू असे भाजपवाले म्हणाले होते. 2019 मध्ये त्याच फॅक्टरीतून बुलेट ट्रेन कोच तयार करू असे म्हणाले. आता 2024 मध्ये ते त्या फॅक्टरीतून वंदे भारत कोच तयार करू असे म्हणतात. महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे हे खासदार म्हणून या फॅक्टरीतून कोच बाहेर काढतील. नांदेड अहमदपूर रेल्वे विकसित झाली पाहिजे. रोकडा सावरगाव पर्यंत प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत रस्ता करू. या परिसरातील ऊस मांजरा परिवार घेऊन जाईल. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करा, असे आवाहन देशमुख यांनी केले.

आमदार वजाहत मिर्झा म्हणाले की, देशातील सध्याचे वातावरण पाहता भाजपचा सुपडा साफ होणार आहे. देशाला स्वातंत्र्य काँग्रेस पक्षाने मिळवून दिले. ही निवडणूक लोकशाही व संविधान वाचवण्याची आहे.माजी मंत्री विनायक पाटील म्हणाले की, देशातील व राज्यातील भाजपच्या कारभाराचा जनतेला वीट आलेला आहे. लोकशाही, संविधान भाजपमुळे धोक्यात आलेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेनुसार ते काम करत नाहीत. मोदी शहा यांच्या काळात देशात दडपशाही वाढली आहे त्यांनी शेतकऱ्यांची आंदोलने चिरडली आहेत.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!