महाराष्ट्र

Congress : काँग्रेसच्या ‘संविधान बचाव’ ला भाजपचे प्रत्युत्तर ; ‘ब्रेक द नॅरेटिव्ह’

Break the Narrative : राज्यातील कामाचा अहवाल पक्षाला सादर

Nagpur : लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि इंडिया आघाडीसाठी ‘संविधान’ हा अत्यंत स्ट्रॉंग पॉईंट ठरला. भाजपने ‘अब की बार चारसौ पार’ चा दिलेला नारा हा संविधान बदलविण्यासाठी असल्याचा मुद्दा काँग्रेसने राष्ट्रीय मुद्दा बनविला आणि तो यशस्वी ठरला. काँग्रेसकडून संविधानाविषयी नॅरेटिव्ह सेट केले जात असल्याचा आरोप करीत भाजपने राज्यभर मोहिम चालविली. यात भाजपला यश मात्र आले नाही. पण संविधानाविषयी मोहिमेचा अहवाल ही जबाबदारी असलेल्या पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठींपुढे ठेवला. भारतीय जनता पार्टीद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात आलेल्या मोहिमेचा अहवाल प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांचेद्वारे ‘ब्रेक द नॅरेटिव्ह’ नावाने प्रसिद्ध करण्यात आला. या अहलावाचे विमोचन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते आज शुक्रवार १४ जून रोजी मुंबई येथे भाजप प्रदेश कार्यकारिणीत करण्यात आले.

राष्ट्रीय महामंत्री श्री. विनोद तावडे, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल, मुंबई प्रदेश अध्यक्ष ऍड. आशिष शेलार, राज्याचे सांस्कृतिक कार्य, वने व मत्य व्यवसाय मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, विदर्भ प्रदेश संघटन मंत्री डॉ. उपेंद्रजी कोठेकर आदी उपस्थित होते.

भाजपची विशेष मोहीम

काँग्रेसकडून ‘भाजपला 400 जागा मिळाल्यास ते संविधान बदलणार’ या प्रचाराच्या विरोधात भाजपकडून विशेष मोहिम देखील हाती घेण्यात आली होती. भाजपच्या काही निवडक पदाधिकाऱ्यांवर या मोहिमेची जबाबदारी सोपविण्यात आली. प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी या मोहिमेचे नेतृत्व करीत काँग्रेसकडून संविधान धोक्यात असल्याचे नॅरेटिव्ह सेट केले जात असल्याचा आरोप केला. भाजपचे अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष माजी मंत्री दिलीप कांबळे, माजी मंत्री राजकुमार बडोले, माजी आमदार सुधीर पारवे, माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार तथा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. मिलींद माने, सुभाष पारधी, संदीप जाधव, शरद कांबळे, राहुल कांबळे या सर्वांनी महाराष्ट्रातील विविध भागात जाऊन पदाधिकारी कार्यकर्ते आणि जनतेत जागृती केली, पत्रकार परिषद देखील घेतल्या.

राज्यातील 15 लोकसभा मतदार संघातील 90 पेक्षा अधिक विधानसभा क्षेत्रात प्रवास करून तिथे 13 पेक्षा अधिक पत्रकार परिषद घेतल्या याशिवाय 40 हजार समाजजागृती पत्रक वाटून संविधानाबाबत सुरू असलेल्या अपप्रचारातील वास्तव पुढे ठेवले तसेच आंबेडकरी चळवळीतील विविध ठिकाणच्या व्यक्तींशी भेट घेउन त्यांच्याशी देखील संवाद साधण्यात आल्याचे भाजपच्या प्रसिद्धी पत्रकातून सांगण्यात येत आहे. या संपूर्ण काळातील कार्य आणि यात सहभागी व्यक्तींना दिलेल्या जबाबदाऱ्या या सर्वांचा अहवाल ‘ब्रेक द नॅरेटिव्ह’च्या रुपात जनतेपुढे सादर करण्यात आला आहे.

Hingoli News : मराठा आरक्षणासाठी, आणखी एका तरुणाची आत्महत्या

या अहवालाच्या विमोचन प्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष प्रा. संजय भेंडे, मुख्यालय संघटन मंत्री रवी अनासपुरे, प्रदेश सहकार्यालय मंत्री संजय फांजे, नागपूर शहराध्यक्ष जितेंद्र (बंटी) कुकडे, आर्थिक प्रकोष्ठचे प्रदेश संयोजक मिलींद कानडे, अनुसूचित जाती मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोकराव मेंढे, राष्ट्रीय अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष जमाल सिद्दीकी, प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील, प्रदेश महामंत्री ॲड. माधवी नाईक, प्रदेश महामंत्री संजय केनेकर, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, मुख्य प्रवक्ते, केशव उपाध्ये, सहमुख्य प्रवक्ते विश्वास पाठक, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी, प्रदेश सचिव सरिता गाखरे, नागपूर शहर महामंत्र संघटन विष्णू चांगदे यांच्यासह महाराष्ट्रातील प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष व महाराष्ट्रातील केंद्रीय पदाधिकारी आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

error: Content is protected !!