Congress News : 10 वर्ष सत्तेत असताना शेतकरी, छोटे व्यापारी, तरुणांना वाऱ्यावर सोडणाऱ्या भारतीय जनता पक्षाला लोकसभेच्या निवडणुकीत पुन्हा त्यांची आठवण झाली. आणि या घटकांचा जाहीरनाम्यात उल्लेख केलेला आहे. भाजपाने नोकरीच्या नावाने देशातील तरुणांना फसवले, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करतो म्हणून शेतकऱ्यांना फसवले, जीएसटीच्या माध्यमातून छोटे व्यापारी व जनतेला फसवून अदानीचे खिसे भरले. आणि याच घटकांना फसवण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे. भाजपाचा जाहीरनामा म्हणजे ‘फेकूनामा’ आहे. जनता आता भाजपाच्या या ‘चुनावी जुमलेबाजी’ला फसणार नाही, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
नागपुर येथे पत्रकारांशी संवाद साधताना नाना पटोले म्हणाले, मोदी सरकारने मागील 10 वर्षात फक्त अदानीसाठी काम केले. हे सरकारच अदानी सरकार होते. पण, जाहीरनाम्यात अदानीचा हिस्सा असायला हवा होता ते मात्र दिसत नाही. समान नागरी कायद्याचे आश्वासन तर मागील निवडणुकीतही दिले होते मग आतापर्यंत भाजपाने त्याची अंमलबजावणी का केली नाही, त्यांना कोणी रोखले होते का? वन नेशन, वन इलेक्शन म्हणजे पुन्हा निवडणुकाच घेणार नाही असे आहे. 2014 व 2019 मध्ये भाजपाने जे सांगितले तेच मुद्दे आजच्या जाहीरनाम्यात आहेत. जनता आता भाजपाच्या फसव्या आश्वासनांना बळी पडणार नाही. लोकसभा निवडणुकीत भाजपाला घरी बसवण्याचा संकल्प जनतेने केला आहे.
Nana Patole : नानांची तक्रार, घातपाताची चौकशी पोलिसांनी करावी !
महिलांचा अपमान करणाऱ्या गडकरींनी माफी मागावी
भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते, केंद्रीय मंत्री व कायमचे भावी पंतप्रधान नितीन गडकरी यांनी चंद्रपूरातील सभेत खालची पातळी गाठली. आमचा उमेदवार शिलाजित खाल्लेला पैलवान आहे, असे विधान करून गडकरींनी महिला वर्गाचा अपमान केला आहे. शिलाजित कशासाठी खातात हे नितीन गडकरींनी सांगावे. महिलांचा अपमान करणाऱ्या नितीन गडकरी यांनी माफी मागितली पाहिजे असेही नाना पटोले म्हणाले.