महाराष्ट्र

Assembly Elections : नागपुरातून एकही हिंदी उमेदवार नाही

Nagpur : हिंदी भाषिकांचा रोष; कार्यकर्ते तापले

एकेकाळी सी पी ॲंड बेरार प्रांताची राजधानी असलेल्या नागपुरात मोठ्या प्रमाणात हिंदी भाषिक लोक आहेत. नागपुरात हिंदी भाषिक लोकप्रतिनिधीदेखील झालेत. मात्र यंदाच्या निवडणूकीत हिंदी भाषिक उमेदवारांकडे सर्वच मोठ्या पक्षांनी दुर्लक्ष केले आहे. भाजपचे तीन उमेदवार जाहीर व्हायचे असले तरी त्यात कुणीही हिंदी भाषिक नसेल अशाच चर्चांनी जोर पकडला आहे.

या पार्श्वभूमीवर शहरातील हिंदी भाषिकांनी एकत्रित येत राजकीय पक्षांविरोधात संताप व्यक्त केला. शहरात लाखो हिंदी भाषिक मतदार असताना हिंदी उमेदवार देण्यास राजकीय पक्षांना अडचण काय असाच सर्वांचा सवाल होता. नागपुरातील पूर्व, मध्य, उत्तर व पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात प्रामुख्याने हिंदी भाषिक मतदारांची मोठी संख्या आहे. अनेक प्रभागांमध्ये तर हिंदी भाषिक मतदारच बहुसंख्य आहेत. असे असतानादेखील यंदा हिंदी भाषिक उमेदवारांना तिकीट देण्यात आलेले नाही. ही बाब हिंदी समाजाला चांगलीच खटकली आहे.

उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार येथील अनेक जण नागपुरात अनेक दशकांपासून स्थायिक झाले असून अनेकांसाठी तर हीच कर्मभूमीदेखील आहे. असे असतानादेखील राजकीय पक्षांकडून दुजाभाव करण्यात येत असल्याचा हिंदी भाषिकांचा आरोप आहे. याविरोधातच रविवारी सकाळी गिट्टीखदान चौकात हिंदी भाषिक कार्यकर्ते एकत्रित आले व घोषणाबाजी केली. विशेष म्हणजे यात सर्वच पक्षांच्या हिंदी भाषिकांचा समावेश होता.

Anil Deshmukh : जेलमध्ये ‘टरबुज्या’ म्हणायचा ‘मी पुन्हा येईन.. मी पुन्हा येईन’

हिंदी भाषिकांच्या नाराजीची सुरुवात पश्चिम नागपुरातील भाजप उमेदवारीच्या चर्चेने झाली. भाजपमधून माजी महापौर दयाशंकर तिवारी, जयप्रकाश गुप्ता यांच्यासारखे नेतेदेखील उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. मात्र, कोहळे यांचे नाव समोर आल्यानंतर हिंदी भाषिक उमेदवारांमध्ये नाराजीचा सूर निर्माण झाला. संपूर्ण नागपुरात भाजप आणि काँग्रेसकडून एकही हिंदी भाषिक उमेदवार देण्यात आलेला नसल्याची ओरड होत आहे. त्यामुळेच रविवारी हिंदी भाषिकांनी एकत्रित येत गिट्टीखदान चौकात सकाळी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.

error: Content is protected !!