Assembly Election : हरियाणाच्या 57 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एका पक्षाने सलग तिसऱ्यांदा बाजी मारली आहे. भाजपने हरीयाणा निवडणुकीत मुसंडी मारली आहे. भाजपने 22 नवीन जागा जिंकल्या आणि विद्यमान 27 जागा वाचवण्यात यश मिळवले. जाटांच्या बालेकिल्ल्यातही नऊ नवीन जागा भाजपने जिंकल्या आहेत. भाजपने 2019 मधील निवडणुकीत 40 जागा जिंकल्या होत्या. त्यापैकी 27 जागा अद्यापही कायम आहेत. याशिवाय विजयात 22 जागांची भर पडली आहे.
जुन्या जागांपैकी काँग्रेसच्या 50 टक्के जागा कमी झाल्या आहेत. त्यामुळे हरीयाणात काँग्रेसला ब्रेक लागला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha) काँग्रेसचे मनोबल उंचावले होते. त्यामुळे हरीयाणात भाजपचा सफाया करू असा काँग्रेसचा दावा होता. मात्र मतदारांनी हा दावा फोल ठरविला आहे. त्यामुळे भाजपने सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याचा बहुमान मिळविला आहे.
दीड तासात आऊट
सकाळी आठ वाजता मतमोजणीला (Counting Of Votes) सुरुवात झाली. त्यावेळी काँग्रेसच्या बाजुने निकाल झुकलेले होते. काँग्रेसला एकतर्फी विजय मिळतो की काय, असे चित्र होते. मात्र दीड तासातच काँग्रेस रेसमधून बाहेर पडली. त्यानंतर भाजपची कमळ एक्स्प्रेस सुसाट सुटली. सुरुवातीला काँग्रेसने 65 जागांवर मजल मारली होती. भाजप 17 जागांवर घसरला होता. मात्र काही क्षणातच चित्र पालटले. सकाळी पावणे दहाच्या सुमारास भाजप आणि काँग्रेस दोघोही प्रत्येक 43 जागांवर पोहोचले. देशातील जवळपास सर्वच राजकीय सर्वेक्षण करणाऱ्या संस्थांनी हरीयाणात काँग्रेसला बहुमत मिळेल असे सांगितले होते. अनेकांनी काँग्रेसला 44 ते 64 जागा मिळतील असे निष्कर्श दाखविले होते. मात्र ईव्हीएममधून (EVM) वेगळीच आकडेवारी बाहेर पडली. ट्रेंडमध्ये मागे पडल्यानंतर काँग्रेस मुख्यालयातून ढोलताशावाल्यांना परत पाठविण्यात आले.
Assembly Election : काँग्रेसच्या मुलाखती आटोपल्या; अहवाल श्रेष्ठींकडे
निकालानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J.P.Nadda) यांनी हरीयाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यांच्याशी संवाद साधला. नड्डा यांनी सैनी आणि प्रदेश भाजपला शुभेच्छा दिल्या. हरियाणा भाजपच्या राज्य मुख्यालयात जल्लोष साजरा करण्यात आला. जुलाना मतदारसंघातून कुस्तीपटू विनेश फोगाट यांनी विजय मिळविला. हरीयाणातील विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सायंकाळी भाजपच्या कार्यकर्त्यांना संबोधित करतील. नड्डा यांनी भाजपच्या सर्व सरचिटणीसांची बैठक बोलावली आहे. दोन्ही राज्यांच्या निकालांव्यतिरिक्त आगामी निवडणुकीच्या तयारीवरही बैठकीत चर्चा होईल. जम्मू-काश्मीरमधील (Jammu & Kashmir) ट्रेंडनुसार काँग्रेस-एनसी सरकार स्थापन होईल असे दिसत आहे.