महाराष्ट्र

Lok Sabha Election : भंडारा-गोंदिया मतदारसंघासाठी ठरली भाजप उमेदवाराची पात्रता

Bhandara-Gondia Constituency : स्वबळावर वियज मिळवू शकेल, अशाला संधी

BJP Politics : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी महायुती फारच जपून पावले टाकत आहे. हा मतदारसंघ काँग्रेसचे दिग्गज नेते तथा प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांचे गृहक्षेत्र आहे. नाना पटोले यांची भीती भाजपच्या स्थानिक नेत्यांना अधिक आहे. एका स्थानिक भाजप नेत्याने आपली उमेदवारी जाहीर होईपर्यंत नानांनी काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर करू नये, ही विनंती फोनद्वारे केली आहे. ही बाब भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना माहिती पडली. त्यामुळे भाजपला नानांच्या तोडीचा उमेदवार देणे बंधनकारक आहे. त्यामुळे भाजपमध्ये अद्यापही विचारविनिमय सुरू आहे.

 

नानांनी जरी आपण भंडारा-गोंदिया लोकसभा लढवणार नसल्याचे जाहीर केले असले तरी ऐनवेळी नाना स्वतःचा एबी फॉर्म भरून निवडणूक रिंगणात उतरल्यास निवडणुकीचे संपूर्ण समीकरण बदलणार आहे. त्यामुळेच नाना पटोले यांच्या तोडीसतोड लढत देईल, असाच उमेदवार भाजपला द्यावा लागणार आहे. भाजपच्या एका स्थानिक नेत्याने नाना पटोले यांना फोन करीत काँग्रेसने भाजपपूर्वी उमेदवारी जाहीर केल्यास उमेदवारांच्या यादीतून आपला पत्ता कट होईल असे सांगितले आहे. त्यामुळे भाजपच्या आधी काँग्रेसने उमेदवार जाहीर करू नये, अशी विनंती या नेत्याने केली आहे. या सर्व घडामोडी बघता आता भाजपला तगडा उमेदवार द्यावा लागणार आहे.

 

उमेदवाराची पात्रता

 

भाजपला विदर्भ पूर्णपणे काबीज करायचा आहे. भंडारा-गोंदिया मतदारसंघही यात आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते तथा राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल हे देखील याच मतदारसंघात येणाऱ्या गोंदिया जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे भाजपला भंडारा-गोंदिया मतदारसंघावर भारतीय जनता पार्टीला वाढवू शकेल, असाच उमेदवार हवा आहे. भंडारा-गोंदियामध्ये दांडगा जनसंपर्क. पटोले आणि पटेल यांना टक्कर देऊ शकेल असा उमेदवार भाजपला हवा आहे. मुत्सद्दी राजकारणाचा अधिक अनुभव, मोदी लाटेव्यतिरिक्त स्वबळावर विजय मिळवू शकेल अशा उमेदवाराला भाजप संधी देणार आहे. अशी पात्रता ज्याच्या अंगी असेल, त्याच उमेदवाराचे नाव भाजप 26 मार्चला घोषित करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!