महाराष्ट्र

BJP Politics : भाजपच्या जागांची ‘खडसें’कडून ‘रक्षा’!

Raksha Khadse : भाजपच्या जागा भाजपच लढेल! केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांचे स्पष्ट संकेत

जिथे भाजपचे आमदार आहेत, त्या जागा भाजपच लढेल अशी स्पष्ट भूमिका केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी रविवारी (1सप्टेंबर) नाशिकमध्ये मांडली. त्यामुळे नाशिक शहरातील मतदारसंघांवर महायुतीतील अन्य पक्षांकडून होणारा दावा निरर्थक ठरेल. कारण या जागा भाजपलाच सुटतील, असे स्पष्ट संकेत खडसे यांनी दिले आहेत. त्यामुळे भाजपच्या या जागांची ‘रक्षा’ करण्यासाठी ‘खडसें’ मैदानात उतरल्या आहेत, अशी चर्चा नाशकात रंगायला लागली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने नगर जिल्ह्यातील सहा विधानसभा आणि नाशिक शहरातील तीन विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी रक्षा खडसे यांच्याकडे दिली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील विधानसभा मतदारसंघांमध्ये सुरू असलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी खडसे नाशिकमध्ये आल्या होत्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. लोकसभा निवडणुकीत आम्ही जे अनुभवले, ते या निवडणुकीत होऊ नये याची दक्षता आम्ही घेत आहोत. मतभेद बाजूला ठेवून राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांच्या प्रचार आणि प्रसारावर भर देण्याच्या सूचना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केल्या आहेत. जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील यासाठी बैठका घेत असल्याचेही खडसे म्हणाल्या.

महायुतीच्या माध्यमातूनच निवडणूक लढविण्याचे वरिष्ठांचे आदेश आहेत. महायुतीमधील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गटदेखील त्याच अनुषंगाने तयारी करीत आहे. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष संघटनेच्या माध्यमातून काय आणि कशी तयारी करायची याबाबत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला.

पक्ष मोठा असल्याने कार्यकर्ते, लोकप्रतिनिधींमध्ये मतभेद असू शकतात. ते आमच्याशी चर्चा करतात. आम्ही वरिष्ठांकडे विषय मांडतो. आमदार, खासदारांबाबत कुणाही कार्यकर्त्याची नाराजी अथवा तक्रार नसल्याचा दावा रक्षा खडसे यांनी केला. उमेदवारीसाठी अनेकजण इच्छुक आहेत. उमेदवारी मागणे गुन्हा नाही. पक्षाने कोणालाही उमेदवारी दिली तरी सगळ्यांनी एकत्रितपणे काम करायचे हे ठरले आहे. मी आज उमेदवार ठरवायला आलेले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. विद्यमान आमदारांनी चांगले काम केले असल्याचे त्या म्हणाल्या.

एकनाथ खडसे परत येणार?

दुसरीकडे एकनाथ खडसे यांनी लोकसभा निवडणुकीत मला पाठिंबा दिला. मला निवडून आणण्यासाठी काम केले. भारतीय जनता पार्टीत परत येण्याची इच्छाही व्यक्त केली. परंतु, तो त्यांचा व्यक्तिगत विषय आहे, असे म्हणत रक्षा खडसे यांनी त्याबाबत अधिक बोलणे टाळले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!