अवघ्या काही महिन्यांवर विधानसभा निवडणुक येऊन ठेपली आहे. त्यापूर्वी जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गट आणि भाजप मधील वाद विकोपाला गेला आहे. एका भाजप आमदारामुळेच जिल्हा प्रमुख गोपाल दातकर यांच्यावर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजप विरुद्ध शिवसेना ठाकरे गट असा सामना रंगणार आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजवायला सुरुवात झाली आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपला सहज विजय मिळविता आला नाही. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटाची जिल्ह्यात पकड आहे. त्यामुळे निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला शिवसेनेचा चांगला फायदा झाला. आता आगामी विधानसभा अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यासाठी जिल्ह्यातील मतदारसंघात इच्छुकांनी देव पाण्यात ठेवले आहेत. अनेकांनी तयारीही सुरू केली आहे. मात्र या विधानसभा निवडणुकीपूर्वीच भाजप विरुद्ध शिवसेना ठाकरे गट असा सामना रंगला आहे. आता हाच सामना सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांच्यावर अट्रोसिटी चा गुन्हा दाखल झाला आहे. भाजपच्या महिला सरपंच यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता याच मुद्द्यावरून दोन्ही पक्षांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. आरोप – प्रत्यारोप केले जात आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर शिवसेना आमदार नितीन देशमुख हे चांगलेच आक्रमक झाले. गुन्हा का दाखल केला? म्हणून त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेटही घेतली.
एका आमदाराचे षडयंत्र!
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी गंभीर आरोप केले आहेत. शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे भाजप काही बिघडवू शकत नाही. म्हणून भाजपच्या एका जबाबदार पदाधिकारी आणि आमदाराने हे षडयंत्र रचल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तक्रारकर्ता महिला सरपंच या भाजपमध्ये आहेत. पोलिसांनी या प्रकरणी कोणतीच चौकशी न करता गुन्हा दाखल केला. या प्रकरणी सखोल चौकशी न झाल्यास जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा नितिन देशमुख यांनी दिला आहे. सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करण्यात येते. कधी ते अकोला शहरातील विविध प्रश्नांना घेऊन असेल तर कधी पीकविमा, पाणीपुरवठा यावरून शिवसेनेने भाजपला कोंडीत पकडले आहे. आता शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखावर गुन्हा दाखल झाल्याने या दोन्ही पक्षात पुढील काळात आणखी वाद रंगण्याची चिन्ह आहेत.
गोपाल दातकर अकोला पूर्व साठी दावेदार?
गुन्हा दाखल झालेले जिल्हाप्रमुख गोपाल दातकर अकोल्यातील हिंगणी बुजरूक येथील रहिवासी आहेत. तर अकोला पूर्व मतदारसंघासाठी ते ठाकरे गटाकडून दावेदार असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे भाजपने जाणीवपूर्वक या गुन्ह्यात आपल्याला अडकवल्याचा दातकर यांचा आरोप आहे. हा संपूर्ण प्रकार उघडकीस येताच राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
ते भाजप आमदार कोण!
आमदार नितीन देशमुख यांनी भाजप आमदारावर षडयंत्र रचल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे ते भाजप आमदार कोण? आमदार देशमुख यांचा रोख कुणाकडे आहे? या चर्चांना उधाण आले आहे. यावर अद्यापही भाजपकडून प्रतिक्रिया आली नाही. मात्र आगामी काळात हे प्रकरण चांगलंच रंगणार आहे.