Chandrashekhar Bawankule : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीत विदर्भात मोठा फटका भाजपला बसला. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत तसं होऊ नये, म्हणून भाजपने विदर्भाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे 12 सप्टेंबरपासून तीन दिवस अकोला, वाशिम आणि बुलढाणा या पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांचा आढावा घेणार आहेत. विधानसभा मतदारसंघाचा दौरा करून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. तीन दिवसांच्या या दौऱ्यात बावनकुळे विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतील. मतदार आणि कार्यकर्त्यांशीही ते चर्चा करतील.
फटका बसू नये म्हणून..
लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीत महायुतीसह भाजपला राज्यात मोठा फटका बसला. विदर्भात तर दोनच जागा भाजपला राखता आल्या. आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीसाठी महायुतीसह महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीची जोरदार तयारी सुरू केली आहे. विदर्भात फटका बसलेल्या भाजपने या भागातील मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. स्वतः प्रदेशाध्यक्ष बावनकुळे पश्चिम विदर्भातील तीनही जिल्हे पिंजून काढणार आहेत. 12 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर असा बावनकुळे यांचा दौरा असेल.
सर्वत्र चर्चा
अकोला, वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा बावनकुळे आढावा घेतील. या दौऱ्यात बावनकुळे तीनही जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा ‘ग्राऊंड रिपोर्ट’ घेतील. कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे. जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते आणि भाजपा पदाधिकारी त्यांच्या या दौऱ्यात उपस्थित राहणार आहेत. बावनकुळे 12 सप्टेंबरला अकोला जिल्ह्यात येतील. मूर्तिजापूर येथुन त्यांच्या दौऱ्याची सुरुवात होईल. मूर्तिजापूर येथील महालक्ष्मी मंगल कार्यालयात ते मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील.
12 सप्टेंबरलाच दुपारी ते अकोट येथील सत्यम पॅलेस हॉटेल येथे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. सायंकाळी अकोला येथील जलसा हॉटेलमध्ये अकोला पूर्व व अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. सायंकाळी सात वाजता अकोल्यापासून जवळच असलेल्या पारस येथील न्यू क्लब बिल्डिंग औष्णिक वीज केंद्रात बाळापूर विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतील. 13 सप्टेंबरला बावनकुळे वाशिम जिल्ह्यात पोहोचतील. रिसोड येथे पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील. त्याच दिवशी दुपारी ते वाशिमच्या परशुराम भवन, जुना नगर पालिका रोड, आंबेडकर मार्ग येथे बैठक घेतील.
मतदार संघाचा आढावा
13 सप्टेंबरला सायंकाळी मानोरा येथील ठाकरे पॅलेस, लालमाती, मंगरूळपीर रोड येथे कारंजा लाड विधानसभा मदतारसंघाचा आढावा घेतील. तिसऱ्या दिवशी म्हणजेच 14 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील हॉटेल मीरा सेलिब्रेशन येथे चिखली विधानसभा मतदारसंघाची माहिती बावनकुळे घेतील. दुपारी मलकापूर येथील भाजपा कार्यालय गणपती नगर येथे बैठक घेतील. त्याच दिवशी सायंकाळी खामगाव येथील तुळजाई हॉटेल, पंचायत समिती समोर येथे खामगाव विधानसभा मदतारसंघातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील.