महाराष्ट्र

Katol constituency : अविनाश ठाकरे विस्तारक ते प्रभारी!

Assembly Election : काटोलची उमेदवारी टाळली, पण जबाबदारी वाढली

Avinash Thackeray : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘गुड बुक’मध्ये राहूनही गेल्या दहा वर्षांपासून वंचित असलेल्यांमध्ये अविनाश ठाकरे यांचा समावेश होतो. नागपूर महानगरपालिकेतील एक तडफदार नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, सत्तापक्ष नेता म्हणून त्यांची ओळख होती. त्यामुळे भाजपची सत्ता आल्यावर त्यांना मोठी संधी मिळण्याची शक्यता होती. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये काटोल विधानसभा मतदारसंघाचे विस्तारक ते प्रभारी एवढाच त्यांचा प्रवास झाला आहे.

मोठी जबाबदारी

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अविनाश ठाकरे यांना काटोल विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्त केले. शनिवारी यासंदर्भातील पत्र जारी करण्यात आले. मुळात ठाकरेंना काटोलमधून विधानसभा लढायची होती. पण उमेदवारी नाकारून मोठी जबाबदारी देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे काटोलमधून लढण्यासाठी अविनाश ठाकरे यांनी आधीपासून तयारी सुरू केली होती. मात्र, गेल्यावेळच्याच उमेदवारावर विश्वास टाकल्याने ठाकरेंची निराशा झाली.

काटोलमध्ये आशीष देशमुख यांना उमेदवारी नाकारून सावनेरला पाठविण्यात आले. पण त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. अशात चरणसिंग ठाकूर यांची शक्ती कमी पडू नये. कार्यकर्त्यांच्या नाराजीचा परिणाम होऊ नये. यासाठी अविनाश ठाकरेंना ही जबाबदारी देण्यात आल्याचे समजते. गेल्या काही वर्षांपासून ते काटोल विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे विस्तारक होते. आता त्यांना निवडणूक प्रभारी करण्यात आले आहे.

अविनाश ठाकरे अनेक वर्ष महानगरपालिकेत नगरसेवक होते. विशेषतः दक्षिण आणि दक्षिण-पश्चिमचा काही भाग त्यांच्या अखत्यारित येतो. त्यांचे वास्तव्य देखील दक्षिण-पश्चिममध्ये आहे. विधानसभा निवडणुकीत दक्षिण किंवा दक्षिण-पश्चिममधून त्यांना उमेदवारी मिळणे केवळ अशक्य आहे. दक्षिणमध्ये प्रत्येक निवडणुकीत आधीपासूनच दावेदारांची रांग असते. तर दक्षिण-पश्चिम हा खुद्द फडणविसांचाच मतदारसंघ आहे. त्यामुळे नागपूर बाहेरचा मतदारसंघ निवडण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता.

Assembly Election : आठवले अपने, भाजप पराये!

कार्यकर्त्यांची फौज

त्यादृष्टीने ठाकरे यांनी काटोल मतदारसंघात काम सुरू केले होते. त्याठिकाणी कार्यकर्त्यांची फौज तयार केली. नियमित दौरा करून जनसंपर्क वाढविला. त्यानंतर ते भाजपचे विस्तारक म्हणून काटोलमध्ये गेले. 2024 मध्ये ठाकरेंना संधी दिली जाण्याची शक्यताही वर्तवण्यात आली होती. पण प्रत्यक्षात तसे झाले नाही. अखेर त्यांना निवडणूक प्रभारी करून वेटिंगवर ठेवण्यात आले आहे. 2029 च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत त्यांना वाट बघावी लागणार आहे. त्यातही चरणसिंग ठाकूर यांनी विश्वास सार्थ ठरवला तर ठाकरेंना दुसरा पर्याय शोधण्याशिवाय पर्याय नाही.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!