जुन्या भाजप-शिवसेना युतीमध्ये बाळापूर मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडण्यात आला. त्याठिकाणी नितीन देशमुख यांनी बाजी मारली. आता ते विद्यमान आमदार आहेत. पण आता राजकीय चित्र बदललं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर महायुतीमधील तीन्ही पक्षांमध्ये ओढाताण सुरू झाली आहे. तीनही पक्षाच्या इच्छुकांकडून तयारी करण्यात येत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत ही जागा कुणाला मिळणार याची उत्सुकता लागलेली आहे.
महायुती आणि महाविकास आघाडीत सध्या जागावाटपावरून चर्चा सुरू आहेत. अनेक मतदारसंघांतील विविध पक्षांच्या दाव्यावरून युती आणि आघाडीतील पक्षांमध्ये मोठी रस्सीखेच सुरू आहे. हाच मतदारसंघ आम्हाला हवा म्हणत दावा केला जात आहे. तर दुसरीकडे इच्छुकांनीही यावर्षी मोठी गर्दी केली आहे. काही इच्छुकांनी मोठ्या प्रमाणात तयारीही सुरू आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघात सध्या शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या ताब्यात असलेल्या या मतदारसंघात आता महायुतीतही मोठी स्पर्धा वाढली आहे.
महायुतीतील शिवसेना, भाजप अणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील इच्छुकही कामाला लागले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी अकोल्यात बैठक घेऊन कार्यकर्त्यांना तसे संकेतही दिले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील इच्छुकांची चिंता वाढली आहे. कारण दुसरीकडे राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून या मतदारसंघावर दावा केला जात आहे.
बाळापूर मतदारसंघाचा विचार केला तर येथे पूर्वी वंचित आघाडीचं वर्चस्व राहिलं आहे. त्यापूर्वी येथे भाजपचं वर्चस्व होतं. तर या मतदारसंघात काँग्रेसचीही ताकद मोठी आहे. दरम्यान भाजप सेनेची युती असताना 2019 मध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेला. शिवसेनेचे नितीन देशमुख हे या मतदारसंघात विजयी झाले. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली. एका पक्षाचे दोन पक्ष झाले. शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस सध्या महायुतीचे घटक आहेत.
पूर्वी बाळापूर हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने हा मतदारसंघ शिवसेनेला मिळावा म्हणून प्रयत्न केले जात आहेत. वरिष्ठांकडून इच्छुकांना कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत. माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया, जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर, विठ्ठल सरप आदींच्या नावांची चर्चा आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून संदीप पाटील, कृष्णा अंधारे यांनीही तयारी सुरू केली आहे. या दोघांकडूनही विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.
इच्छुकांची गर्दी
महायुतीत दावे प्रतिदावे सुरू आहेत. त्यामुळे बाळापूर मतदारसंघ चर्चेत आला आहे. अद्यापही या मतदारसंघावरून तिन्ही पक्षांमध्ये एकमत झाले नसल्याची माहिती आहे. भाजप आणि शिवसेनेत चांगलीच रस्सीखेच सुरू असल्याचे बोलले जात आहे. भाजपकडून जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांवर दावा केला जात आहे. मात्र शिंदेंच्या शिवसेनेकडून बाळापूर मतदारसंघावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. त्यामुळे आगामी काळात या मतदारसंघाच्या दाव्यावरून तीन्ही पक्षांमध्ये मोठी ओढताण होण्याची शक्यता आहे.