भारतीय जनता पार्टीच्या 10 वर्षाच्या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय महामार्ग करण्यात 10 वर्षात 13 हजार 600 किमीची वाढ झाली. महाराष्ट्राला ‘फाईव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी’ करण्यासाठी ‘संकल्पपत्र’ अत्यंत महत्त्वाचे आहे. आज जगात 36व्या क्रमांकावर असलेली भारताची अर्थव्यवस्था पहिल्या दहामध्ये आणण्यासाठी हे ‘संकल्पपत्र’ ‘व्हिजन डाक्यूमेंट’ ठरेल, असा विश्वास वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच भाजपाच्या वचननामा समितीचे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र भाजपाच्या ‘संकल्पपत्रा’चे रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते प्रकाशन झाले. मुंबईत झालेल्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, जाहिरनामा समितीचे संयोजक डॉ. विनय सहस्रबुद्धे, मुंबई भाजपा अध्यक्ष आशीष शेलार उपस्थित होते.
महायुतीचे सरकार येणे ही महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक आहे. गेल्या 54 वर्षांत पायाभूत सुविधांमध्ये कधीही न झालेली विक्रमी वाढ झाली आहे. ‘संकल्पपत्र’ महाराष्ट्राची प्रगती, विकास आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या रजतेच्या राज्याच्या संकल्पनेची पूर्ती करणारे ‘व्हिजन डाक्यूमेंट’ आहे. या संकल्पपत्रामुळे महाराष्ट्राची विकसित व लोककल्याणकारी राज्याची वाटचाल वेगवान होईल. हे संकल्पपत्र राज्याच्या पुढच्या वाटचालीचे दृष्टीपत्र ठरणार आहे, असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की, ‘जनतेकडून आलेल्या हजारो सूचनांचा विचार करून हे ‘संकल्पपत्र’ साकारले आहे. 18 विषयवार उपसमित्यांनी यासाठी श्रम घेतले आहेत. संकल्पपत्राकरिता महाराष्ट्रातील 877 गावांमधून ई-मेल आणि पत्राद्वारे 8935 सूचना प्राप्त झाल्या. हे संकल्पपत्र केवळ निवडणुकीपुरते मर्यादित न राहता निवडणुकी नंतर अंमलबजावणी करण्याचे दस्तावेज ठरणार आहे. एकेक मुद्द्यावर आधारित अंमलबजावणी समिती तयार करण्यात येणार असून यामध्ये देशातील विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवारांचा समावेश करण्यात येईल.’
दहा वर्षांत जीडीपी वाढला
भारतीय जनता पार्टीच्या सरकारमुळे महाराष्ट्राच्या प्रगतीला गती मिळाली आहे, हे पटवून देताना मुनगंटीवार यांनी आकडेवारी सादर केली. ते म्हणाले, ‘महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून 1 मे 1960 ते 2014 पर्यंत राज्याचा जीएसडीपी 15 लक्ष 37 हजार 366 कोटी होता. त्यात मागील दहा वर्षात वाढ होऊन तो 40.44 कोटी झाला. तर 1 मे 1960 पासून 2014 पर्यंत महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न 1 लक्ष 25 हजार होते. ते आज 2 लाख 77 हजार रुपयांपर्यंत गेले आहे. महाविकास आघाडीच्या काळात इतिहासात पहिल्यांदा 6 हजार रुपयांनी दरडोई उत्पन्न खाली आले.’