BJP Protest : सिंधुदुर्गच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. महायुतीने शिवरायांची माफी मागितली आहे. तरीही बदलापूर अत्याचार घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी महाविकास आघाडीने राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन केले. तर महायुतीमधील भाजपकडून या आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यास आता सुरुवात झाली आहे. यामध्ये बुलढाणा शहरात रविवारी भाजपने आंदोलन करत जशास तसे उत्तर देण्याचा प्रयत्न केला.
बुलढाण्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश मांटे, माजी आमदार विजयराज शिंदे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विनायक भाग्यवंत यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जयस्तंभ चौकात निषेध आंदोलन केले. यावेळी माजी आमदार विजयराज शिंदे यांनी ‘महाविकास आघाडीने या घटनेत घाणेरडे राजकारण केले आहे. त्याची फळ त्यांना भोगावी लागतील,’ असा खणखणीत इशारा दिला.
‘बदलापूर अत्याचार घटनेतील नराधमाला शिक्षा झाली पाहिजेच. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आम्ही या घटनेतील आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी केली आहे. देवेंद्र फडणवीस देखील अशा घटनांबाबत गंभीर्याने हाताळत आहेत. कायदा सर्व बाजूने पीडित कुटुबाला न्याय देण्यासाठी काम करत आहे. परंतु महाविकास आघाडीने यात घाणेरडे राजकारण केले. महाराष्ट्र बंद करून ही घटना वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रकार केला. या घटनेच्या आडून सरकारकडून चांगल्या योजनांबाबत अपप्रचार महाविकास आघाडीत करत आहे. जनेतला देखील हे लक्षात आले आहे. त्यामुळे अशा घाणेरड्या राजकारणाचं फळ महाविकास आघाडीला भोगावं लागेल, असेही शिंदे यांनी म्हटले.
महाविकास आघाडीच्या कपटी आंदोलनाला माजी आमदार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जशास तसे उत्तर दिले. “राज्यात महायुती सरकारने विकास कामांची गंगोत्री आणली. प्रत्येक पावलावर सरकारी योजनांचा लाभ सर्वसामान्यांना मिळतो आहे. महिलांना सर्वाधिक योजना मिळवून देण्याचा प्रयत्न महायुती सरकारकडून सुरू आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, अन्नपूर्णा योजना, महिलांना प्रवासात सवलत, अशा अनेक योजनांमुळे महायुतीवर महिलांचा विश्वास वाढत चालला आहे. हेच कुठेतरी महाविकास आघाडीला खटकत आहे आणि त्यातून अपप्रचार करत आहे, अशी टीका जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश मांटे यांनी केली.