Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीस यांचे एकेकाचे स्वीय सहाय्यक आणि निकटवर्तीय सुमित वानखडे यांच्या आमदारकीचा मार्ग मोकळा झाला आहे. भारतीय जनता पार्टीच्या यादीत वानखडे यांचे नाव समाविष्ट करण्यात आले आहे. वर्धा जिल्ह्यातील आर्वी विधानसभा मतदारसंघातून वानखडे यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर मतदारसंघातून विद्यमान आमदार हरीश पिंपळे यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. हरीश पिंपळे हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कट्टर समर्थक आहेत.
सई डहाके यांना संधी
कारंजा विधानसभा मतदारसंघातून सई डहाके यांना संधी देण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यातील तिवसा मतदारसंघातून राजेश वानखेडे काँग्रेसच्या विद्यमान आमदार तथा माजी मंत्री यशोमती ठाकूर यांना भाजपच्यावतीने उमेदवार म्हणून टक्कर देतील. उमेश यावलकर यांना भाजपने मोर्शी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सुपुत्र सलील देशमुख काटोल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात आहेत. त्यांना भाजपकडून चरणसिंग ठाकूर हे प्रत्युत्तर देतील.
तिसऱ्या यादीत 25 उमेदवार
सावनेरमध्ये काँग्रेसने माजी मंत्री सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा केदार यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात आता भाजपने आशिष देशमुख यांना उमेदवार केले आहे. भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा मतदारसंघातून अविनाश ब्राह्मणकर हे भाजपचे उमेदवार आहेत. चंद्रपुरातून किशोर जोरदार यांना पुन्हा एकदा भाजपने संधी दिली आहे. आर्णी विधानसभा मतदारसंघातून राजू तोडसाम यांना उमेदवारी मिळाली आहे. उमरखेड मध्ये किशन वानखेडे हे भाजपकडून निवडणूक लढवतील.
भाजपच्या तिसऱ्या यादीत एकूण 25 उमेदवारांना स्थान देण्यात आले आहे. काही मतदारसंघांबाबत लवकरच महायुतीमध्ये निर्णय होईल. त्यानंतर उर्वरित उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल असे सांगण्यात येत आहे. काही मतदारसंघांमध्ये भाजप समोर पक्षांतर्गत बंडाळीचे आव्हान आहे. अशा मतदारसंघातील नावे अगदी शेवटच्या क्षणी जाहीर केली जात आहेत.
BJP List : ‘द लोकहित’ची बातमी खरी ठरली; आमदार धुर्वे यांचा पत्ता कट
अर्ज दाखल करण्याची लगबग
सोमवारी (28 ऑक्टोबर) भाजपच्या अनेक नेत्यांनी राज्यभरात उमेदवारी अर्ज दाखल केले. ही लगबग सुरू असतानाच दुसरी उमेदवारी यादी जाहीर झाली आहे. त्यामुळे विदर्भातील जवळपास सर्वच मतदारसंघांमधील चित्र आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे उमेदवारी मिळालेल्या नेत्यांनी आता अर्ज भरण्यासाठी धावाधाव सुरू केली आहे. भाजपकडून अनेक नेत्यांना आधीच अर्ज तयार करून ठेवण्याची सूचना देण्यात आली होती. त्यानुसार शेवटच्या क्षणी होणारी धावपळ टळणार आहे. अनेक मतदारसंघांमध्ये तिहेरी तर काही मतदारसंघांमध्ये चौफेर लढत होणार आहे.