महाराष्ट्र

Assembly Election : फडणवीस सरसावले; नाराजांची काढली समजूत

BJP : निवासस्थानी बैठक; पश्चिम नागपूर भाजपमध्ये अस्वस्थता

Devendra Fadnavis : नागपूर पश्चिम मतदारसंघात भाजपने सुधाकर कोहळे यांना उमेदवारी देत सरप्राइज दिले आणि इच्छुकांमध्ये नाराजीचा सूर पसरला. पार्सल उमेदवार खपवून घेणार नाही अशा पोस्ट मतदारसंघात फिरणे सुरू झाले. या मतदारसंघाचे महत्त्व लक्षात घेता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: पुढाकार घेतला व नाराजांची समजूत काढण्यासाठी सर्वांना देवगिरी या त्यांच्या शासकीय निवासस्थानी बोलवून घेतले. तेथे त्यांनी सर्वांची बैठक घेत त्यांची समजूत काढली व पूर्ण ताकदीने भाजपचा प्रचार करण्याच्या सूचना केल्या.

उमेदवारी जाहीर

या मतदारसंघात अखेरच्या क्षणी कोहळे यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे नाराज झालेल्या दयाशंकर तिवारी यांनी फेसबुकवर पोस्ट टाकत भावना मांडली. बरडे समर्थकांनी तर सोमवारी एकत्रित येत ‘बाहेरील पार्सल’ नको अशी घोषणाबाजी करत बरडे त्यांनी अपक्ष उभे राहावे, अशी मागणी केली. हिंदी भाषिकांच्या रविवारी झालेल्या आंदोलनात भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षपणे सहभागी झाले होते. या पार्श्वभूमीवर नाराजीचा फटका, भाजप पराभूत होतो की काय या चर्चांना सुरुवात झाली होती.

या सर्व बाबी लक्षात घेता फडणवीस यांनी मंगळवारी सायंकाळी देवगिरीवर नागपूर पश्चिममधील भाजपच्या पदाधिकाऱ्यांना बोलविले. त्यात माजी महापौर संदीप जोशी, माया इवनाते, माजी उपमहापौर संदीप जाधव, रमेश चोपडे, प्रगती पाटील, अश्विनी जिचकार, डॉ. वैशाली चोपडे इत्यादींचा समावेश होता. यावेळी सुधाकर कोहळे हेदेखील उपस्थित होते. विविध समीकरणे लक्षात घेत भाजपला येथे उमेदवार निश्चित करावा लागला. यात बाहेरील उमेदवार वगैरे बाबींकडे लक्ष न देता केवळ भाजपचा उमेदवार याकडे लक्ष देण्यात यावे. कोहळे यांचा पूर्ण ताकदीने प्रचार करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन फडणवीस यांनी यावेळी केले. यावेळी त्यांनी या मतदारसंघातील प्रचाराच्या नियोजनाबाबत देखील जाणून घेतले.

Akola West : विजय अग्रवाल यांना उमेदवारी मागे घ्यायला लावा 

प्रचारात एकजूट दिसेल?

देवेंद्र फडणवीस यांनी समजूत घातली तरीही प्रचारात एकजूट दिसण्याची शक्यता कमीच आहे. ज्यांनी सुधाकर कोहळेंच्या विरोधात नारेबाजी केली, विरोधी भूमिका घेतली ते लोक प्रचारात उतरतील का, हा प्रश्न कायम आहे. विशेष म्हणजे संदीप जोशी, दयाशंकर तिवारी, नरेश बरडे यांचे कार्यकर्ते व समर्थक कमालीचे नाराज आहेत. शिवाय ही नेते मंडळी देखील पक्षश्रेष्ठींच्या भूमिकेवर नाराज आहेत.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!