Bengaluru : कर्नाटकातील चामराजनगर येथील भाजप खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचे वयाच्या 76 व्या वर्षी रविवारी रात्री बेंगळुरू येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. गेल्या 4 दिवसांपासून ते आयसीयू मध्ये होते. श्रीनिवास यांना अनेक आजारांनी ग्रासले होते आणि त्यांना 22 एप्रिल रोजी बेंगळुरू येथील मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अनेक अवयव निकामी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
त्यांचे पार्थिव आज त्यांच्या म्हैसूर येथील जयलक्ष्मीपुरम येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी आणण्यात येणार आहे. व्ही.श्रीनिवास चामराजनगरमधून 7 वेळा खासदार आणि नंजनगुड मधून 2 वेळा आमदार होते. त्यांनी अलीकडेच निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती जाहीर केली होती.
व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचा राजकीय प्रवास
व्ही. श्रीनिवास प्रसाद यांनी एकूण 14 निवडणुका लढवल्या. त्यापैकी आठ जिंकल्या. चामराजनगर मतदारसंघातून त्यांनी नऊ लोकसभा निवडणूक लढवून सहा जिंकल्या. त्यांनी 1999 ते 2004 पर्यंत लोकजनशक्तीचे खासदार म्हणून वाजपेयी मंत्रिमंडळात केंद्रीय मंत्री म्हणून काम केले. ते दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले आणि त्यांनी कर्नाटकचे महसूल मंत्री म्हणून काम पाहिले.
त्यांनी 1980 मध्ये जनता पक्षाचे सदस्य म्हणून लोकसभेचा प्रवास सुरू केला. आधी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नंतर जनता दल (युनायटेड) आणि नंतर काँग्रेसमध्ये परतले. 2016 मध्ये सिद्धरामय्या मंत्रिमंडळातून काढून टाकल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
Lok Sabha Election : केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार
1999 ते 2004 दरम्यान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये त्यांनी केंद्रीय राज्यमंत्रीपद भूषवले. नंतर, काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर ते 2013 मध्ये आमदार झाले आणि सिद्धरामय्या सरकारमध्ये मंत्री झाले. 2016 मध्ये त्यांनी कर्नाटक विधानसभेचा राजीनामा दिला आणि नंतर भाजपमध्ये प्रवेश केला. 2017 च्या पोटनिवडणुकीत, त्यांनी भाजपच्या तिकिटावर नंजनगुडमधून निवडणूक लढवली होती, परंतु नंतर 2019 मध्ये पक्षाने श्रीनिवास यांना चामराजनगरमधून लोकसभा निवडणूक लढवायला लावली, जिथून ते विजयी झाले. परंतु, त्यांनी नुकतीच राजकारणात संन्यास घेत असल्याची घोषणाही केली होती.