2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये प्रादेशिकतेच्या मुद्यावरून वाद सुरू झाला आहे. पंजाबमधील संगरूर येथील काँग्रेसचे उमेदवार सुखपाल सिंग खैरा यांनी उत्तर प्रदेश आणि बिहारमधील जनतेविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून हा गोंधळ अद्याप थांबलेला नाही. या संपूर्ण वादावर आता भाजप खासदार मनोज तिवारी यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. मी पंजाबला जात असून कोण अडवणार ते बघू, असे आव्हान दिले आहे.
काय म्हणाले सुखपाल खैरा..
सुखपाल खैरा यांनी यूपी-बिहारसह अन्य राज्यांतील स्थलांतरितांबाबत वादग्रस्त विधान केले होते. ते म्हणाले होते की, हे लोक पंजाबमध्ये कबजा करून पंजाबियत नष्ट करतील. त्यामुळे हिमाचल प्रदेशच्या धर्तीवर पंजाबमध्येही असा कायदा केला पाहिजे, ज्याच्या अंतर्गत राज्याबाहेरील लोक जमीन खरेदी करू शकत नाहीत. मतदार होऊ शकत नाहीत आणि सरकारी नोकऱ्या करू शकत नाहीत. खैरा यांनी या प्रकरणावर नंतर स्पष्टीकरण दिले आणि सांगितले की त्यांनी कधीही कोणावर बहिष्कार टाकण्यास सांगितले नाही.
भाजप खासदार मनोज तिवारींचे आव्हान
मी पंजाबमध्ये जात आहे, काँग्रेसने बिहार आणि उत्तर प्रदेशातील लोकांना प्रवेश दिला जाणार नाही, असे सांगितले. मला कोण रोखतो मी पाहणार आहे.लोकांना प्रवेश करण्यापासून रोखणारा काँग्रेस कोण आहे? असा सवाल त्यांनी केला. अशा प्रकारे फूट पाडणारी कृती खपवून घेणार नाही असा इशारा तिवारी यांनी दिला आहे.