Karnataka Keral BJP : ‘मला अभिनय करायची इच्छा आहे. मी कोणालाही मंत्रीपद मागितले नव्हते. पक्षाने मला मंत्री केले. मी आभारी आहे. पण मला अभिनय करायचा आहे. त्यामुळे मला या जबाबदारीतून मुक्त करा.’ केरळमध्ील एकमेव भाजप मंत्री सुरेश गोपी यांचे हे वाक्य आहे. कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर काही तासातच गोपी यांनी राजीनामा देऊ केला आहे. गोपी यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. रविवारी नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाने राष्ट्रपती भवनात शपथ घेतली. त्यात गोपी यांचाही समावेश होता.
गोपी हे केरळमधील खासदार आहेत. ते भाजपचे पहिले आणि एकमेव खासदार आहेत. त्यामुळेच त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. गोपी यांनी केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र आता ते मंत्रिपद सोडण्याची शक्यता आहे. शपथविधी समारंभानंतर सुरेश गोपी यांनी नवी दिल्लीत एका मल्याळम वृत्तवाहिनीशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, मी मोदींकडे किंवा पक्षाकडे मंत्रीपद मागितले नव्हते. मला आशा आहे की, ते लोक (एनडीए) लवकरच मला पदमुक्त करतील.
रुपेरी पडदाच प्रिय
सुरेश गोपी यांना राजकीय खुर्चीपेक्षा रुपेरी पडदाच प्रिय आहे. ते म्हणाले, ‘मी काही चित्रपट साईन केले आहेत. मला ते करायचे आहेत. मी माझा मतदारसंघ त्रिशूरचा खासदार म्हणून काम करत राहणार आहे.” सुरेश गोपी हे त्रिशूर लोकसभेतून खासदार म्हणून निवडून आले आहेत. ते केरळमधील भाजपाचे पहिले खासदार आहेत. त्रिशूरमध्ये त्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार व्ही. एस. सुनीलकुमार यांचा 74 हजार 686 मतांनी पराभव केला. गोपी यांनी पक्षाला कोणतीही मागणी केली नव्हती. तरीही त्यांची लॉटरी लागली.
मला केवळ खासदार म्हणून काम करत राहायचं आहे. मी त्यांना म्हटलं होतं की मला या पदाची आवश्यकता नाही. मला वाटतं की लवकरच पदमुक्त होईन. मात्र त्रिशूरमधील मतदारांचं मी नुकसान होऊ देणार नाही. मी प्रामाणिकपणे सांगतो की मी त्यांच्यासाठी खूप चांगलं काम करेन. मला मंत्रीपद सांभाळता येणार नाही. कारण कोणत्याही परिस्थितीत मला माझे चित्रपट करायचे आहेत, असे गोपी म्हणाले. सुरेश गोपी हे मुळचे केरळमधील अलप्पुझा येथील रहिवासी आहेत. कोल्लम येथून त्यांनी पदव्युत्तर पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं.
Narendra Modi 3.0 : राज्यांतून मंत्री वाढवून ‘डॅमेज कंट्रोल’ नव्हे तर प्रत्यक्ष कामही लागणार
बालपणापासून काम
सुरेश गोपी यांनी बालवयापासूनच मल्याळम चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. 1998 मध्ये प्रदर्शित झालेल्या कलियाट्टम या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. ते गेल्या अनेक वर्षांपासून काही टीव्ही शो होस्ट करत आहेत. राजकारणापेक्षा त्यांनी रुपेरी पडद्याला प्राधान्य दिले आहे. गोपी यांच्या राजीनाम्यामुळे विरोधक भाजपवर टीका करू शकतात. कामच करायचे नव्हते तर अभिनेत्याला मंत्रीपद दिलेच कशाला अशी टीका भाजपवर होऊ शकते