देश / विदेश

Oath Ceremony : ओवैसींचे संसदीय सदस्यत्व होणार रद्द?

Asaduddin Owaisi : संसदेत घुमला 'जय फिलिस्तीन' चा नारा !

 Political News :  अठराव्या लोकसभेमधील सदस्यांचा शपथविधी सोमवारी पार पडला. या शपथविधीमध्ये ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी घेतलेली शपथ वादात सापडली आहे. शपथ घेतल्यानंतर त्यांनी ‘जय फीलिस्तीन’ (पॅलेस्टाईन) अशी घोषणा दिली. या घोषणेवरून सध्या राजकारण सुरू झाले असून ओवैसी यांचे संसदीय सदस्यत्व रद्द करण्याची मागणी आता आजार धरू लागली आहे.

https://whatsapp.com/channel/0029VaUpEJn7YSd10QyUIR35

लोकसभेच्या कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी खासदार म्हणून शपथ घेतली. यादरम्यान त्यांनी संसदेत शपथविधी सोहळ्यात ‘जय फीलिस्तीन’ म्हणत वाद निर्माण केला. प्रोटेम स्पीकर यांनी अससुद्दीन ओवेसी यांना लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेण्यासाठी बोलावले. यावेळी त्यांनी आपल्या शपथेची सुरुवात बिस्मिल्लाचे पठण करून खासदार म्हणून शपथ घेतली. शपथ घेताना त्यांनी ‘जय भीम, जय तेलंगणा’ आणि नंतर ‘जय पॅलेस्टाईन’च्या घोषणा दिल्या. त्यानंतर भाजप खासदारांनी संसदेत गदारोळ सुरू केला.

ओवैसी हे पाचव्यांदा खासदार म्हणून संसदेत आले आहेत. त्यांना संसदीय राजकारणाचा दीर्घकाळ अनुभव राहिला आहे.असदुद्दीन ओवैसी यांनी अठराव्या लोकसभेमध्ये उर्दू भाषेतून शपथ घेतली. त्यांनी शपथेच्या शेवटी “जय भीम, जय मीम, जय तेलंगणा, जय फिलिस्तीन” असे म्हटले.

विधान अधिकृत नोंदींमधून वगळले

सध्या इस्राएल आणि पॅलेस्टाईन या दोन देशांमध्ये संघर्ष सुरू आहे. अलीकडेच इस्राएलने केलेल्या हल्ल्यामध्ये पॅलेस्टाईनमधील रफाह भागातील अनेक निष्पाप लोक मृत्युमुखी पडले होते. त्यानंतर ‘ऑल आईज् ऑन रफाह’ नावाची मोहीमही सेलिब्रिटींसह अनेकांनी सुरू केली होती.

Lok Sabha Speaker : अखेर राहुल गांधी, नरेंद्र मोदी यांनी हात मिळविलाच

भारतातील सेलिब्रिटींसह अनेकांनी पॅलेस्टाईनबाबत सहानुभूती व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवरच असदुद्दीन ओवैसी यांनी शपथ घेतल्यानंतर ‘जय फिलिस्तीन’ असे म्हटले. मात्र, त्यानंतर सत्ताधारी पक्षाकडून या कृतीवर आक्षेप नोंदविण्यात आला. हंगामी अध्यक्षांनी ओवैसी यांनी केलेले हे विधान अधिकृत नोंदींमधून वगळण्याचा निर्णय दिला.

जे बोलायचे होते, मी तेच बोललो

शपथविधीनंतर झालेल्या गोंधळानंतर संसदेबाहेर पत्रकारांशी बोलताना ओवैसी यांनी पॅलेस्टिनी नागरिकांच्या संदर्भाने म्हटले की, “ते अत्याचारित लोक आहेत.” नेमक्या कोणत्या आधारावर माझ्या वक्तव्यावर आक्षेप घेतला जात आहे, असा प्रतिप्रश्न करत ते म्हणाले की, “इतरही अनेक सदस्य शपथ घेताना वेगवेगळ्या गोष्टी बोलत आहेत. मग ते चूक कसे असेल? राज्यघटनेमध्ये अशी कोणती तरतूद आहे मला दाखवून द्या.

इतरांनीही काय म्हटले आहे ते जरा ऐका. जे मला बोलायचे होते, ते मी बोललो आहे. महात्मा गांधींनी पॅलेस्टाईनबद्दल काय म्हटले आहे, तेही वाचा.” ओवैसी यांनी पॅलेस्टाईनचे समर्थन पहिल्यांदाच केले आहे असे नाही. याआधीही त्यांनी पॅलेस्टाईनच्या समर्थनात अनेक वक्तव्ये केली आहेत. मात्र, शपथ घेताना ‘जय फिलिस्तीन’ असे म्हणणे वादाचे कारण ठरले असून ओवैसी यांनी मात्र आपल्या सदस्यत्वाच्या अधिकारक्षेत्रातच हे वक्तव्य केल्याचे ठामपणे म्हटले आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!