Tushar Bhartiya : महायुतीच नव्हे तर भाजपमधूनही आता राणा दाम्पत्याला मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे. निवडणुकीत आशीर्वाद दिला नाही, तर पंधराशे रुपये परत घेईल, असे विधान रवी राणा यांनी केले. त्यावरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राणा यांच्यावर सडकून टीका केली आहे. अशातच भाजपचे माजी नगरसेवक तुषार भारतीय यांनीही आता राणा यांच्यावर निशाणा साधला आहे. मेळाव्यात सहभागी न झाल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही, अशा धमक्या विविध अधिकारी, अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून महिलांना देण्याचे काम रवी राणा यांनी केले आहे, असा आरोप भाजपचे नेते माजी नगरसेवक तुषार भारतीय यांनी केला आहे.
तुषार भारतीय हे रवी राणा यांचे विरोधक मानले जातात. भाजपने राणा यांच्या पत्नी नवनीत राणा यांना पक्षात घेतले आहे. त्यानंतरही महायुतीमधील सर्वच नेत्यांकडून राणा यांना विरोध वाढतच आहे. नवनीत राणा या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्या. आता बडनेरा विधानसभा मतदारसंघातून महायुती आणि महाविकास आघाडीतील सर्वच नेत्यांनी रवी राणा यांना घेरण्याची तयारी चालविली आहे. त्यातच रवी राणा यांचे वक्तव्य वादात सापडले आहे. सोमवारी (ता. 12) रवी राणा यांनी येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिला लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यात त्यांनी महिलांना इशाराच दिला.
ही थेट धमकीच
कार्यक्रमात बोलताना राणा यांनी निवडणुकीत मतदान न केल्यास दीड हजार रुपये परत घेईल असा इशारा महिलांना दिला. राणा यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली. महिलांना देण्यात येणाऱ्या पैसा यांच्या बापाचा आहे का? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला. हा पैसा मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांच्या खिशातील नाही. हा सरकारी तिजोरीतील पैसा आहे. अशा वक्तव्यातून या लोकांची नीती दिसते, असेही वडेट्टीवार म्हणाले. वडेट्टीवार यांच्यानंतर भाजपचे माजी नगरसेवक तुषार भारतीय यांनीही राणा यांच्यावर टीका केली.
रवी राणा यांनी मेळाव्यात महिलांची गर्दी दिसावी, यासाठी विविध अधिकारी, अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधून त्यांना निर्देश दिले. महिला या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या नाहीत, तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही, अशा धमक्या महिलांना अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून देण्यात आल्या. रवी राणांची मस्ती याच भगिनी उतरविल्याशिवाय राहणार नाहीत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही रवी राणा यांच्या घरची नाही, तर सरकारची आहे. हा भगिनींचा अपमान आहे. रवी राणांनी याबद्दल महिलांची कान पकडून माफी मागितली पाहिजे, असे तुषार भारतीय म्हणाले.
रवी राणा हे अमरावती शहराला लागून असलेल्या बडनेरा मतदारसंघाचे अपक्ष आमदार आहेत. त्यांच्या पत्नी नवनीत राणा या माजी खासदार आहेत. राणा दाम्पत्य हे संधीसाधू असल्याचा आरोप त्यांच्यावर सातत्याने होतो. महायुतीमधील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, प्रहार असे सगळेच राणा यांच्या विरोधात आहेत. महाविकास आघाडीमध्ये तर राणा हे नाव अजिबातच चालत नाही. अशात आता भाजपमधूनच राणा यांना विरोध होत असल्याने बडनेऱ्यात राणा यांच्यासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.