आचारसंहिता लागू झाल्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडीसाठी पुढचे आठ दिवस आव्हानात्मक आहेत. जागावाटपावर शिक्कामोर्तब झाले तरीही पक्षातीलच अंतर्गत वाद डोकेदुखी ठरणार आहे. सध्या काटोल मतदारसंघावरून भाजपची अवस्था तशीच आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात लढण्यासाठी भाजपचेच दोन नेते आमनेसामने आले आहेत.
२०१४ मध्ये आशीष देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ते काटोलमधून त्यांचेच काका तत्कालीन मंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात लढले. ती निवडणूक जिंकल्यानंतर देशमुख यांनी काही कालावधीने भाजपला रामराम ठोकला आणि काँग्रेसमध्ये गेले. २०१९ मध्ये ते फडणवीस यांच्या विरोधात दक्षिण-पश्चिम नागपूरमधून लढले आणि पराभूत झाले. त्यांना पुन्हा साक्षात्कार झाला आणि ते भाजपमध्ये परतले. आता ते काटोल मतदारसंघावर दावा करत आहेत. तिथे त्यांचा सामना अनिल देशमुख किंवा सलील देशमुख यांच्याशी होऊ शकतो.
पण एकदा पक्षाला दगा देऊन बाहेर पडलेला माणूस परत येऊन उमेदवारी मागतो, हे अनेकांना पटलेले नाही. त्याचा सर्वाधिक विरोध काटोलचे भाजपचे नेते चरणसिंग ठाकूर करीत आहेत. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात आशीष देशमुख यांनी जाहीरपणे उमेदवारी मागितली होती. त्यांनी चरणसिंग ठाकूर यांना थेट आवाहन केले होते. ‘मला विधानसभा लढू द्या, मी जिंकल्यावर तुम्हालाही आमदार करेन’ असं देशमुख म्हणाले होते. ‘लाडकी बहीण’ योजनेचा कार्यक्रम होता. त्यावेळी देशमुख आणि ठाकूर यांच्यात लाडक्या भावांप्रमाणे संवाद झाला होता.
मात्र ठाकूर यांनी नकार दिला होता. त्यावेळी त्यांनी सौम्यपणे देशमुख यांचे आवाहन फेटाळून लावले होते. आता ते दंड थोपटूनच उभे झाले आहेत. काटोलच्या जागेवर आपणच लढणार असं ते ठामपणे सांगू लागले आहेत. दोघांमधील वाद जास्तच वाढू लागला आहे. काही दिवसांपूर्वी एकमेकांचे माईक हिसकावण्यापर्यंत मजल गेली. त्यामुळे स्वतः चिंताग्रस्त असलेले जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांच्यापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.
Chandrashekhar Bawankule : शिंदे-शाह यांच्यातील चर्चेबद्दल अनभिज्ञ
जिल्हाध्यक्षांचा फतवा
सुधाकर कोहळे सध्या भाजपचे जिल्हा अध्यक्ष आहेत. जिल्ह्यातील नेत्यांमध्ये दिलजमाई व्हावी आणि निवडणूक कुठल्याही बंडखोरीशिवाय पार पडावी, याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यामुळे त्यांनी उमेदवारी जाहीर होईपर्यंत दोघांच्याही कार्यक्रमांना जाऊ नका, असा फतवाच काटोल भाजपसाठी काढला आहे.
सुधाकर कोहळे स्वतः चिंतेत
या संपूर्ण प्रकारात जिल्हाध्यक्ष कोहळे स्वतःच चिंतेत आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांचे दक्षिण नागपूरमधून तिकीट कापण्यात आले होते. त्याठिकाणी फडणवीस यांचे खास मित्र मोहन मते यांना उमेदवारी देण्यात आली. मोहन यांना काठावर मते पडली आणि ते कसेबसे निवडून आले. पण त्यांना पुन्हा तिकीट मिळू नये यासाठी कोहळे आणि भाजपचे इतर लोक प्रयत्नात आहेत. त्यामुळे आपली समस्या सोडवावी की जिल्ह्याचं टेंशन घ्यावं, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे.