महाराष्ट्र

Buldhana Constituency : शिंदेंच्या आमदाराला शिंदेंकडून प्रत्युत्तर, म्हणाले..

Assembly Election : दोन नेत्यांमधील वाद चिघळण्याच्या वाटेवर 

Shiv Sena Vs BJP : बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील दोन नेत्यांमधील वाद चिघळण्याची चिन्हे आहेत. या मतदारसंघात सध्या शिवसेनेचे विद्यमान आमदार संजय गायकवाड आणि भाजप नेते विजयराज शिंदे समोरासमोर आले आहेत. एकेकाळी शिवसेनेमध्ये असलेले विजयराज शिंदे आता भाजपवासी आहेत. संजय गायकवाड हे त्यांचे कट्टर राजकीय वैरी. भाजपमध्ये गेल्यानंतर गायकवाड आणि शिंदे यांच्यातील वाद वाढत गेले. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत गायकवाड यांच्या विरोधात शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

आरोपाची झडती 

विजयराज शिंदे यांनी संजय गायकवाड यांच्यावर आरोप केल्यानंतर गायकवाड यांनी त्यांच्या बापच काढला. शिंदे यांच्याबद्दल एकेरी उल्लेख करीत गायकवाड यांनी त्यांना आव्हान दिलं. शिंदे यांच्या बापात दम असेल तर त्याने निवडणूक लढावीच, असं गायकवाड म्हणाले होते. गायकवाड यांच्या या विधानानंतर आता विजयराज शिंदे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. कुणाच्या बापात किती दम आहे, हे 23 नोव्हेंबरला निकाल लागल्यानंतरच कळेल, असं शिंदे म्हणाले.

पितापुत्र मैदानात 

बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून संजय गायकवाड हे निवडणूक लढवीत आहेत. त्यांचा मुलगा मृत्युंजय उर्फ कुणाल हा देखील विधानसभा निवडणुकीत उतरला आहे. आमदार होण्यापूर्वी गायकवाड बुलढाणा नगर परिषदेच्या राजकारणात सक्रिय होते. नगरपरिषदेच्या राजकारणात त्यांचे प्रचंड वजन होते. त्यानंतर शिवसेनेने त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी संधी दिली. अनेक वर्षांपासून विजयराज शिंदे हे देखील बुलढाणा शिवसेनेत कार्यरत होते. आनंदराव अडसूळ हे बुलढाण्याचे खासदार असताना अडसूळ आणि शिंदे यांचा बुलढाणा जिल्ह्यात बऱ्यापैकी जोर होता. अडसूळ यांचा मतदारसंघ बदलल्यानंतर शिंदे यांची बुलढाणामध्ये पीछेहाट सुरू झाली. शिंदेंच्या विरोधकांनी डोके वर काढले.

शिवसेनेने त्यानंतर विजयराज शिंदे यांची उमेदवारी नाकारली. त्यामुळे ते शिवसेना सोडून भारतीय जनता पार्टीकडे गेले. तेव्हापासून ते भारतीय जनता पार्टीत कार्यरत आहेत. मात्र आता विजयराज शिंदे यांनी संजय गायकवाड यांच्या विरोधात शड्डू ठोकला आहे. गायकवाड हे भाजपच्या नेत्यांबद्दल अपशब्द काढतात. मोदी-शहा यांच्याबद्दल ते वाटेल तसं बोलले. देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातही त्यांनी वक्तव्य केलं. भाजपच्या बुलढाण्यातील नेत्यांबद्दल शिवीगाळ केली. त्यामुळे आपण त्यांच्या विरोधात निवडणूक लढण्याची परवानगी मागितल्याचे शिंदे म्हणाले. या चढाओढीत संजय गायकवाड यांनी विजयराव शिंदे यांचा बाप काढल्याने ते देखील आता चांगले संतापले आहेत.

BJP Attack : साजिद, राजेश मिश्रा एकाच नाण्याच्या दोन बाजू

दोन नेत्यांमधील हा वाद आता बाप काढण्यापर्यंत गेल्याने विजयराज शिंदे निवडणुकीतून माघार घेतील असे दिसत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला चर्चेसाठी बोलावल्याचा दावाही शिंदे यांनी केला आहे. मात्र हे सगळे दावे पोकळ असल्याची टीका संजय गायकवाड यांच्या समर्थकांकडून होत आहे. विजयराज शिंदे हे चिल्लर केस आहे, असं अजूनही शिवसेना आमदार संजय गायकवाड म्हणत आहेत.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!