Assembly Election : महायुतीच्या विरोधात उमेदवार उभे करणारे आमदार रवी राणा हे गद्दार आहेत. त्यांच्यामुळे अमरावतीमध्ये महायुतीत वाद निर्माण होत आहेत. त्यामुळे त्यांना महायुतीतून लाथ मारून बाहेर काढून घेण्यात यावे, असा संताप भाजपचे नेते तुषार भारतीय यांनी व्यक्त केला. रवी राणा यांनी आपले उमेदवार मागे घेतल्याशिवाय बडनेरातून माघार घेणार नाही, असं ठाम मत भारतीय यांनी ‘द लोकहित’शी बोलताना व्यक्त केलं.
महायुतीने पाठिंबा दिला
रवी राणा यांना बडनेरा विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीने पाठिंबा दिला आहे. त्यांच्या पत्नी माजी खासदार नवनीत राणा यांना भाजपने पक्षात घेतले आहे. यानंतरही केवळ व्यक्तिगत आकसापोटी राणा यांनी महायुतीच्या उमेदवारांविरोधात लढा सुरू केला आहे. रवी राणा यांचा स्वतःचा पक्ष आहे. महायुतीत असल्याचे सांगणाऱ्या राणा यांनी खरंतर महायुतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी काम करायला पाहिजे. असंच काम नवनीत राणा यांच्याकडून अपेक्षित आहे, असेही भारतीय म्हणाले.
राणा घातक
रवी राणा आणि नवनीत राणा हे दोघेही राजकीय दृष्टीने घातक आहेत. राणा हे कधीही कोणाशी प्रामाणिक राहत नाहीत. महायुती मधील उमेदवारांच्या विरोधात तर राणा यांनी उघड बंडच पुकारले आहे. त्याचा फटका अमरावती जिल्ह्यात महायुतीला बसणार आहे. त्यामुळे बडनेरा विधानसभा मतदारसंघात महायुतीने राणा यांचा पाठिंबा काढावा. आपण सुरुवातीपासूनच भाजपची एकनिष्ठ आहोत. त्यामुळे गद्दारी करणाऱ्या राणा यांच्या पाठिंबा काढून तो आपल्याला द्यावा, अशी मागणी भारतीय यांनी केली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी नवनीत राणा यांच्या नावाला महायुती मधील प्रत्येकाचा विरोध होता. त्यानंतरही महायुतीमधील अनेकांनी राणा यांच्या विजयासाठी काम केले. त्यावेळी जवळपास सगळ्यांनीच मतभेद बाजूला ठेवत नरेंद्र मोदी यांचे सरकार यावं, यासाठी काम केलं. परंतु रवी राणा आणि नवनीत राणा हे प्रामाणिकपणाच्या लायकीचे नाहीत. असं असतं तर त्यांनी अमरावती जिल्ह्यामध्ये महायुतीच्या विशेषता भाजपच्या विरोधात उमेदवार दिले नसते. वैयक्तिक शत्रुत्व बाजूला ठेवत त्यांनी महायुतीचे सरकार यावं यासाठीच काम केलं असतं, याकडेही तुषार भारतीय यांनी लक्ष वेधलं.
सहानुभूती नाही..
रवी राणा यांच्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा म्हणून आपल्याला कोणाचाही फोन आलेला नाही. भाजपच्या कोणत्याही नेत्याकडून राणा यांच्यासाठी आपल्याला फोन येण्याची शक्यता कमीच आहे. त्याला कारणही तसेच आहे. रवी राणा काय चीज आहे हे भाजपमध्ये सर्वांनाच ठाऊक आहे. केवळ भाजपच नव्हे तर संपूर्ण राज्याच्या राजकारणात राणा काय आहेत, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. त्यामुळे प्रत्येकाशी पंगा घेणाऱ्या राणा यांच्या संदर्भात कोणाच्याही मनात सहानुभूती नाही असं ठाम मतही तुषार भारतीय यांनी व्यक्त केलं.