Assembly Election : भारतीय जनता पार्टीनं 99 उमदेवारांच्या नावाची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत दुसऱ्याच क्रमांकावर प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांचं नाव आहे. आमदार टेकचंद सावरकर यांचा पत्ता कापत बावनकुळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे सावरकर दुखावले आहेत. आता महाविकास आघाडी आणि परिवर्तन महाशक्तीनं सावरकर यांच्याशी संपर्क साधला आहे. त्यामुळं उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवसापर्यंत सावरकर निर्णय घेऊ शकतात, असं सांगितलं जात आहे. पण याबाबत स्वत: सावरकर यांनीच आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
याबाबत सावरकर यांनी स्वत: भाष्य केलं आहे. महाविकास आघाडीच्या व तिसऱ्या आघाडीच्या नेत्यांनी उमेदवारीसाठी माझ्याशी संपर्क साधला. मात्र, मी भारतीय जनता पक्षाची एकनिष्ठ आहे. पक्षाच्या निर्णयावर समाधानी नसलो तरी पक्षाच्या निर्णयाशी एकनिष्ठ राहणार असल्याचे टेकचंद सावरकर यांनी सांगितले आहे. कदाचित पक्षाला आपल्याबद्दल विजयाची खात्री नसेल असं त्यांनी स्पष्ट केलं. सावरकर हे कामठी विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. भाजपच्या पहिल्या यादीतच त्यांचं नाव कापण्यात आलं आहे. सावरकर यांच्या कामठी मतदारसंघातून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना संधी देण्यात आली आहे.
व्हिडीओ व्हायरल
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल आमदार टेकचंद सावरकर यांनी वक्तव्य केलं होतं. आम्ही इतकी मोठी भानगड कशासाठी केली? ज्या दिवशी तुमच्या घरासमोर मतदानाची पेटी येईल. त्यावेळी माझ्या लाडक्या बहिणी भाजपला मतदान करतील, यासाठी आम्ही हा जुगाड केला, असं सावरकर म्हणाले होते. मी खरे बोलतो. माझे बोलणे खरे आहे की नाही? नाहीतर बोलायचे एक आणि करायचे एक असं नाही. आपण काही रामदेव बाबांचे कार्यकर्ता आहोत का? असे टेकचंद सावरकर यांनी म्हटलं होतं. सावरकर यांच्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीनं महायुतीवर टीका केली होती.
भाजपने 2019 मध्ये शिवसेनेने लढवलेल्या जागांवरही पहिल्या यादीमध्येच उमेदवार घोषित केले आहेत. अचलपूरमध्ये 2019 मध्ये अपक्ष आमदार बच्चू कडू जिंकले होते. त्यावेळी शिवसेनेने निवडणूक लढवली होती. यंदा अचलपूरचा मतदारसंघ भाजपने शिवसेनेकडून घेतला आहे. या मतदारसंघातून भाजपने प्रविण तायडे यांना उमेदवारी दिली आहे. देवळी मतदारसंघातून शिवसेनेचा उमेदवार 2019 मध्ये रिंगणात होता. समीर देशमुख हे पराभूत झाले होते. आता येथे राजेश बकाने हे निवडणूक लढतील. कामठीत मात्र सावरकरांना डच्चू देत बावनकुळे यांना संधी देण्यात आली आहे. यापूर्वी भाजपनं एकदा बावनकुळे यांचीही उमेदवारी नाकारली होती.